शरद पवारांचा गृहमंत्र्यांना फोन; वैयक्तिक सुरक्षेविषयी स्पष्ट केली भूमिका

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 January 2021

नेते मंडली सुरक्षेवरील अनावश्यक खर्चाची पर्वा न करता, राज्य सरकारवर टीका करत आहेत. राज्य सरकार सूड बुद्धीने हा निर्णय घेत असल्याचे बोलत आहेत.

मुंबई : राज्य सरकारने राज्यातील काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय जाहीर केलाय. यावरून भाजपने आगपाखड सुरू केली आहे. अशात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वेगळीच भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या भूमिकेचं सोशल मीडियावरही कौतुक होतंय.

 

सुरक्षेत कपात करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर भाजपमधील बड्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कपात केलेल्या नेत्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापासून, माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, नारायण राणे यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश आहे. यातील राज ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आलीय तर, राणे यांची सुरक्षा हटविण्यात आलीय. नेत्यांच्या सुरक्षेत कपात झाल्यामुळं भाजपनं राज्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केलीय. अशा वेळ ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून आपल्या सुरक्षेतही कपात करण्याची मागणी केलीय. त्यांच्या या भूमिकेविषयी गृहमंत्री देशमुख यांनी स्वतः माहिती दिली आहे. एकीकडे नेते मंडली सुरक्षेवरील अनावश्यक खर्चाची पर्वा न करता, राज्य सरकारवर टीका करत आहेत. राज्य सरकार सूड बुद्धीने हा निर्णय घेत असल्याचे बोलत असताना, शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने सुरक्षा नाकारण्याचा निर्णय घेतल्याने त्याविषयी कौतुक होताना दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar calls anil deshmukh personal security