पाच राज्यांत भाजपचा पराभव होणार - शरद पवार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

मुंबई महापालिकेत युतीची 25 वर्षे सत्ता असताना स्वछ पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला नाही. मुख्यमंत्री म्हणतात महापालिकेत भ्रष्टाचार आहे. असे असेल तर शिवसेनेसोबत सत्तेत का बसला होता, असा सवाल त्यांनी फडणवीस यांना केला. 

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीचा देशभरातील नागरिकांना त्रास झाला आहे. याचा परिणाम म्हणून पाच राज्यांत होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव होईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (ता. 4) केले. मानखुर्द येथील प्रचारसभेत ते बोलत होते. या वेळी खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, मुंबई विभाग राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर उपस्थित होते. 

पंतप्रधानांच्या बॅंकांच्या रांगेत टाटा, अंबानी नव्हते; तर सर्वसामान्य गरीब माणूस उभा होता. कोट्यवधी लोक मोदींमुळे रांगेत उभे राहिले. हजारो कोटींचा रोजगार बुडला, यामध्ये कष्टकरी वर्ग भरडला. मुंबईसारख्या शहरात कष्टकरी व कामगारांचे आयुष्य उद्‌ध्वस्त झाले. केंद्राच्या या निर्णयामुळे देशात बदल झाले. 

मुंबईत खड्ड्यांची भीषण समस्या आहे. नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, पुणे इथे आमची सत्ता आहे. येथील कारभार बघा, नवी मुंबईत पिण्याचे पाणी व स्वछता याबद्दल जी काळजी घेतली जाते, त्याच्या 50 टक्‍केही काळजी मुंबईत घेतली जात नसल्याचे सांगून माजी मंत्री गणेश नाईक यांच्या कारभाराचे पवार यांनी कौतुक केले. 

मुंबई महापालिकेत युतीची 25 वर्षे सत्ता असताना स्वछ पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला नाही. मुख्यमंत्री म्हणतात महापालिकेत भ्रष्टाचार आहे. असे असेल तर शिवसेनेसोबत सत्तेत का बसला होता, असा सवाल त्यांनी फडणवीस यांना केला. 

राष्ट्रवादी परिवर्तन करेल : पटेल 
मुंबईत परिवर्तनाशिवाय पर्याय नाही व हे परिवर्तन राष्ट्रवादीच करेल, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. मराठी माणसाचे हित जपले पाहिजेच, पण मुंबईत येऊन मुंबईच्या समृद्धीत भर घालणाऱ्या कष्ट करणाऱ्यांचेही हित जपले पाहिजे, याकडे पटेल यांनी लक्ष वेधले.

Web Title: Sharad Pawar criticize BJP