दत्तकाच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही; पवारांचा फडणवीसांना टोला

दत्तकाच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही; पवारांचा फडणवीसांना टोला

मुंबई  : "काहींनी सांगितले की मी जिल्हा दत्तक घेतो...मला गमंत वाटली...आमचे बापजादे आहेत आम्हाला सांभाळणारे...आम्हाला बाहेरचा दत्तक लागत नाही...बाहेरच्या दत्तकाच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही.

स्वकष्टाने...स्वकर्तृत्वाने चालवणारे लोक आहोत,'' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दत्तक विधानावर टोला लगावला. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात नाशिकमधील हिरे कुटुंबीयांनी आज भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. 

"आम्हाला माहीत होते की हे दत्तक विधान काही टिकणार नाही. आपल्याला दत्तक बापावर अवलंबून राहण्याची आवश्‍यकता नाही. आपला खराखुरा बाप शेतकरी आहे. शेतकरी हाच आपला खरा घटक आहे. त्याच्या मदतीने पुढे जावूया,'' अशा शब्दांतही शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता हल्ला चढवला. 

माजी आमदार प्रशांत हिरे व अपूर्व हिरे यांचे शरद पवार यांनी पक्षात स्वागत केले. सोबत नाशिकच्या शेतकऱ्यांच्या कष्टाचे कौतुकही केले. भाऊसाहेब हिरे यांचे नाशिकसाठी असलेल्या योगदानाबाबतही त्यांनी भाष्य केले. नाशिकच्या अनेक गोष्टी आहेत ज्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. फळबागायतीमध्ये क्रांती केलेला हा नाशिक जिल्हा असल्याचे गौरवोद्‌गारही पवार यांनी या वेळी काढले. 

"हिरे कुटुंबीयांची विचारधारा चांगली आहे. ते दुसऱ्या पक्षात गेले तो अपघात होता. त्या अपघातातून सावरून त्यांनी त्यांची गाडी योग्य वळणावर आणली आहे. भुजबळांना बळ देण्यासाठी हे दोन तरुण आता उभे ठाकले असून, आता सगळ्या क्षेत्रांत नाशिकचा नावलौकिक वाढवण्यासाठी सर्वांनीच कामाला लागा, आमची साथ कायम राहील,'' असे आश्‍वासन पवार यांनी दिले. 

या वेळी पक्षात प्रवेश केलेले माजी मंत्री प्रशांत हिरे आणि आणि माजी आमदार अपूर्व हिरे यांनीही विचार व्यक्त केले. 

राष्ट्रवादीची ताकद वाढणार 
माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी आमदार अपूर्व हिरे आणि अद्वैत हिरे यांचे पक्षात प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी स्वागत केले. या पक्षप्रवेशामुळे नाशिकसह दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढणार आहे, असे ते म्हणाले. संकटामध्ये जसे विठ्ठलाचे नाव आठवते तसे दुष्काळातील संकटामध्ये शरद पवारांचे नाव देशातील शेतकऱ्यांना आठवते, असे सांगतानाच नाशिक जिल्हा शरद पवारांवर प्रेम करणारा असून, येत्या निवडणुकीमध्ये हे सिद्ध करून दाखवू, असे आश्‍वासन आमदार छगन भुजबळ यांनी या वेळी दिले. 

इतरांना धक्का न लावता अंमलबजावणी करा’
‘‘न्यायालयात जाण्याचा अधिकार सर्वांना आहे. एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट पटली नाही, तर त्यावर भूमिका मांडण्याचा त्याला अधिकार आहे. राज्य सरकारने ज्या आधारावर निर्णय घेतला, त्या आधारावर म्हणणे कोर्टात मांडेल. आमचे एकच म्हणणे आहे, आतापर्यंत ज्या वर्गाच्या हिताची जपणूक करताना जे काही निर्णय घेतले गेले आहेत, त्याला जराही धक्का न लावता हा जो काही नवीन वर्ग आहे त्याला १६ टक्के आरक्षण देण्याची अंमलबजावणी सरकारने करावी,’’ अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली. दरम्यान, मुस्लिम आरक्षण हे दिलेच पाहिजे. त्यामुळे येत्या काळात मुस्लिम, धनगर समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com