आॅपरेशन केले पण दुर्लक्षामुळे पेशंट गमावला- पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

इंदिरा गांधींनंतर जेव्हा तुमच्या हातात सत्ता होती, तेव्हा तुम्ही का नाही धाडस दाखवलं. सतत 70 वर्षांचा उल्लेख करता त्यात तुमचे पण राज्य होते. सगळे मी करतो, मी करतो, हे पंतप्रधानांचे म्हणणे मला पटत नाही. या 70 वर्षांत अनेकांनी योगदान दिले आहे. हे नाकारता येणार नाही.

मुंबई - देशातला काळा पैसा बाहेर काढण्याच्या सरकारच्या निर्णयाला आपले समर्थन आहे. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीत चूक झाली  डाॅक्टरने आॅपरेशन केलं, मात्र नंतर लक्ष न दिल्यानं पेशंट दगावला अशी स्थिती झाली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली.  

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर टीका केली. यावेळी पवार यांनी नोटबंदीच्या निर्णयामुळे झालेल्या विविध परिणामांचा आढावा घेतला. अनेक ठिकाणी नव्या नोटा सापडत आहेत, त्याबाबत बोलताना पवार म्हणाले, ''मागच्या दारातून काही व्यवहार सुरु असतील अशी शक्यता आहे. शासकीय यंत्रणा यात सहभागी झाल्याशिवाय हे शक्य नाही. टिव्हीवर पाहतो की छापे घातले, नोटा जप्त केल्या याची जबाबदारी कुणाची? या नोटा आरबीआयमधून येत असतील तेव्हा ही जबाबदारी सरकारचीच आहे." 

जिल्हा बँकांना व पर्यायाने शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणींबाबत बोलताना पवार म्हणाले, "जिल्हा बँकांबाबत मी स्वतः अर्थमंत्र्यांची भेट घेतली. पण सहकारात राजकीय लोक आहेत आणि त्यांच्यावर विश्वास नाही, असे सांगण्यात आले. अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होत आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला उठाव नाही. छोट्या उद्योगांना उपासमारीची वेळ आली आहे."

''बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा मिळत आहेत. सुट्टे पैसे मात्र मिळत नाहीत. मी सुद्धा संसदेमध्ये सुट्ट्या पैशांच्या अडचणीला सामोरा गेलो. मग सामान्य माणसांचं काय. देशाच्या अर्थव्यवस्थेवर, लोकांवर जे परिणाम झाले त्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि निर्णय घेणाऱ्यांना टाळता येणार नाही." असेही पवार म्हणाले. बँक कर्मचारी काम करत आहेत, पण कॅश करन्सी नसल्याने त्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. आरबीआय, स्टेट बँकेने काहीही केलेले नाही. एवढा मोठा निर्णय घेता, त्याची तयारी का करत नाही? नोटा का छापून ठेवल्या नाहीत, असा प्रश्नही पवार यांनी यावेळी उपस्थित केला. 

मी बोललो तर भूकंप होईल, असे वक्तव्य काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी नुकतेच केले होते. त्याचाही समाचार पवार यांनी घेतला. "भूकंप होणार म्हणून मी घाबरलो. इमारत कोसळेल असे वाटू लागले. पण प्रत्यक्षात काहीच झालं नाही." अशा शब्दात पवार यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याची खिल्ली उडवली 

राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांत भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत. त्याबाबत बोलताना या जागा भाजपनं सत्तेच्या जोरावर निवडून आणल्याचे पवार यांनी सूचीत केले. ते म्हणाले, "स्थानिक स्वराज्य संस्था कशा जिंकायच्या, हे त्यांच्यापेक्षा आम्हाला माहिती आहे. पण जे आता आमच्याकडे नाही ते त्यांच्याकडे आहे."

भारतीय जनता पक्षाचे नेते कुठल्याही प्रसंगी काँग्रेसकडे बोट दाखवतात. त्याचाही समाचार पवार यांनी घेतला. ते म्हणाले, "इंदिरा गांधींनंतर जेव्हा तुमच्या हातात सत्ता होती, तेव्हा तुम्ही का नाही धाडस दाखवलं. सतत 70 वर्षांचा उल्लेख करता त्यात तुमचे पण राज्य होते. सगळे मी करतो, मी करतो, हे पंतप्रधानांचे म्हणणे मला पटत नाही. या 70 वर्षांत अनेकांनी योगदान दिले आहे. हे नाकारता येणार नाही."

Web Title: Sharad Pawar criticize on Narendra Modis demonetization decision