मोदी गडी बोलायला लई हुशारः पवार

शाम उगले
गुरुवार, 5 जानेवारी 2017

नोटाबंदीमुळे आज सगळ्याच शेतमीलाचे भाव घसरले आहेत, याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘‘माझ्याकडे दोन एकरात वांगी होती. मात्र वांगी तोडायला आणि मुंबई-पुण्याच्या बाजारात पाठविण्यासाठी येणारा खर्चही वसूल होणार नाही, हे माझ्या लक्षात आलं. शेवटी ट्रॅक्टर नाही तर नांगर घाल आणि वांगी काढून टाक असं मी माझ्या सहकाऱ्याला सांगितलं. माझ्यासारख्याची ही स्थिती तर तुमची काय अवस्था होणार? ``

पिंपळगाव बसवंत (नाशिक) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (गुरूवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयावर कोरडे ओढले. "मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयावर लोकं गप्प आहेत, याचा अर्थ ते वेड नाहीत. सरकारचा निर्णय नोटाबंदीचा आहे, की नसबंदीचा याचा निकाल ते योग्यवेळी मतपेटीतून दिल्याशिवाय राहणार नाहीत," असा इशारा देतानाच पवार यांनी विनोदी शैलीत मोदी आणि पवार यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधावरही टीप्पणी केली.

"लोक म्हणतात मोदींशी तुमचे चांगले संबंध आहेत, ते तुमच्या गावीही आले होते. म्हटलं आले तर मग काय? नाही तसं नाही, ते नुसते आले नाहीत तर पुण्याच्या भाषणात त्यांनी सांगितलं की, पवार साहेबांनी मला करंगळीला धरून राजकारणात आणलं. हे ऐकून मी म्हटलं, मेलो आता! यांना राजकारणात मी आणलं... म्हटलं आता यापुढे काय बोलायचं? मोदी बोलायला गडी फारच हुशार. अस्सं जोरात भाषण देतंय की, समोरच्या माणसाला वाटतंय की हाय बॉ नक्कीच ५६ इंच छाती हाय. ५० दिन मुझे दे दो, फिर आप जो कहेंगे वो सजा दो... असं मोदी म्हणाले होते. नोटाबंदीला ५० दिवस पूर्ण झाले. उध्दव ठाकरे त्याबद्दल बोलले आहेत. त्यांचं भाषण आम्ही ऐकलं. आता (मोदींना) कोणत्या चौकात उभं करायचं, कसला आसुड हातात घ्यायचा, चाबुक घ्यायचा की वेताची छडी घ्यायची की आणखी काय घ्यायचं.. असं ते भाषणात बोलले. म्हटलं बाबा, तुम्ही सगळे गळ्यात गळे घालणारे लोक आहात तर तुम्हीच हे ठरवा. तुम्हाला काय योग्य वाटतंय ते घ्या...," असे पवार यांनी सांगितले.  

येथील शरदश्‍चंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात पवार यांनी नर्मविनोदी शैलीत नोटाबंदीच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना बसलेला फटका, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात केलेले भाषण, शिवसेनेची भूमिका यांचा समाचार घेतला. भाषणाच्या सुरूवातीलाच त्यांनी नोटबंदीच्या निर्णयाचे सामान्यांकडून सुरूवातीला झालेले उत्सफूर्त स्वागत, सरकारने पुरेशा तयारीशिवाय घेतलेल्या निर्णयामुळे महिनाभरात बॅंकेतून पैसे मिळविण्यासाठी सोसावे लागणारे हाल तसेच या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याविषयी व्यवहारातील उदाहरणे देऊन सरकारच्या या निर्णयाची अक्षरश: पिसे काढली.

वांग्यावर नांगर फिरवला
नोटाबंदीमुळे आज सगळ्याच शेतमीलाचे भाव घसरले आहेत, याकडे पवार यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘‘माझ्याकडे दोन एकरात वांगी होती. मात्र वांगी तोडायला आणि मुंबई-पुण्याच्या बाजारात पाठविण्यासाठी येणारा खर्चही वसूल होणार नाही, हे माझ्या लक्षात आलं. शेवटी ट्रॅक्टर नाही तर नांगर घाल आणि वांगी काढून टाक असं मी माझ्या सहकाऱ्याला सांगितलं. माझ्यासारख्याची ही स्थिती तर तुमची काय अवस्था होणार? ``

पंतप्रधानांनी नोटबंदीचा निर्णय घेताना काळा पैसा उघड होईल, बनावट चलन रोखले जाईल, दहशतवादाला प्रतिबंध बसेल, अर्थव्यवस्थेला गती मिळेल, अशी कारणे दिली होती. परंतु या निर्णयामुळे शेतकरी, व्यापारी, उद्योजक, कामगार या पैकी कुणीही खुश नाही, मग नेमके खुश आहे तरी कोण, असा प्रश्‍न पवार यांनी उपस्थित केला. शेतमालाचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. देशातील मोठ्या लोकसंख्येजवळ पैसा येतो व ते बाजारात खर्च करतात, तेव्हाच अर्थव्यवस्थेला गती येत असते. परंतु या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यामुळे अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होणार आहे. या निर्णयामुळे लोकांना बॅंकेतून पुरेसे पैसे मिळत नसल्याने सर्वांनीच जपून खर्च करण्यास सुरूवात केली आहे. सरकार आता कॅशलेस व्यवहारासाठी आवाहन करीत आहे, परंतु त्यासाठी आपली पुरेशी तयारी नसल्यामुळे शंभर टक्के कॅशलेस आपल्या येथे यशस्वी होऊ शकणार नाही. नोटबंदीच्या धक्‍क्‍यातून बाहेर येण्यास सहा महिने ते तीन वर्षे कालावधी लागेल, असे तज्ज्ञ सांगत आहेत. पण तीन वर्षानंतर तुमची काय अवस्था राहील,याचा विचार करा असे ते म्हणाले.

सरकारची पुढची पायरी सोने आहे, आमच्या प्रत्येक आई-बहिणीच्या गळ्यात किती सोनं आहे, याची ते चौकशी करणार आहेत, अशी तोफ पवारांनी डागली.

Web Title: Sharad Pawar critisized Narendra Modi in Nashik