'देश विकासासाठी अखेरपर्यंत झटणार'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

पिता व कन्या...
देशात पंडित नेहरू व इंदिरा गांधी यांच्यानंतर फक्त आपण व सुप्रिया सुळे यांनाच भारताच्या वतीने प्रतिनिधित्व करण्याची पिता व कन्या अशी संधी प्राप्त झाली. याचा अभिमान असून, बारामतीकरांनी दाखविलेल्या विश्‍वासाने हे साध्य झाल्याचे शरद पवार यांनी सांगितले. अप्पासाहेब पवार, प्रतापराव पवार यांना पद्मश्री व आपल्याला पद्मविभूषण असे एकाच कुटुंबात तीन पद्म पुरस्कार मिळण्याची ही दुर्मिळ घटना असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. 

बारामती - ‘‘माझा शेवटचा श्‍वास सुरू असेपर्यंत बारामती, महाराष्ट्र आणि देश बदलण्याच्या कामात हातभार लावण्याचा एक कलमी कार्यक्रम माझ्याकडून सुरू असेल. जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली याचा मनापासूनचा आनंद आहे,’’ अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

बारामती शहर व तालुक्‍यातील नागरिकांच्या वतीने शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीस पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तसेच त्यांना पद्मविभूषण सन्मान मिळाल्याबद्दल गुरुवारी (ता. १३) शरद पवार व प्रतिभाताई पवार यांचा शारदा प्रांगणात नागरी सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार हेमंत टकले, विद्या चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे व पंचायत समितीचे सभापती संजय भोसले यांनी पवार यांचा मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. 

सत्काराला उत्तर देताना पवार यांनी बारामतीबद्दलच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. १९६७ च्या निवडणुकीत मी सोडून इतर दहापैकी कोणालाही उमेदवारी द्या, अशी मागणी सर्वांनी केली होती. पण यशवंतराव चव्हाणांनी मला संधी दिली, हा किस्सा त्यांनी या वेळी सांगितला. बालवाडीच्या शिक्षणापासून ते महाविद्यालयीन जीवनापर्यंतचा आढावा घेत त्यांनी अनेक गमती जमती सांगितल्या. कृषी व शिक्षणाच्या माध्यमातून बारामती परिसराचा कायापालट घडविण्यात यश मिळाल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. नीरावागजची एक मुलगी न्यूयॉर्कमध्ये भेटते यासारखा शिक्षणाने झालेल्या परिवर्तनाचा दुसरा आनंद नसल्याचे त्यांनी बोलून दाखविले. 

सत्ता नसल्याची फारशी चिंता आपण कधी केलीच नाही. चढ-उतार होतच असतात व सत्ता नसताना लोकांशी अधिक मोकळेपणाने बोलता येते, असे पवार यांनी सांगितले. भाषणाच्या प्रारंभीच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करीत बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा गौरव केला. 

Web Title: Sharad Pawar expressed his feelings