'जनावरांकडे होणारे दुर्लक्ष योग्य नव्हे'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मे 2019

‘सरकारकडून जनावरांसाठी पाण्याची सोय केली जात नाही. ही बाब चांगली नाही. आज संपूर्ण महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. काळ कठीण आहे. मात्र, आपण हरायचं नाही,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य शासनाच्या दुष्काळ निवारणाच्या उपाय योजनांसंदर्भात शनिवारी नापसंती व्यक्त केली.

कोरेगाव (जि. सातारा) - ‘सरकारकडून जनावरांसाठी पाण्याची सोय केली जात नाही. ही बाब चांगली नाही. आज संपूर्ण महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. काळ कठीण आहे. मात्र, आपण हरायचं नाही,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य शासनाच्या दुष्काळ निवारणाच्या उपाय योजनांसंदर्भात शनिवारी नापसंती व्यक्त केली.

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील चिलेवाडीसह दोन-तीन गावांसाठीच्या दुष्काळी उपाय योजनांसाठी स्वत:च्या खासदार निधीतून एक कोटी, तर चिलेवाडी आणि परिसरातील गावांना पाण्याचे टॅंकर उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्रस्टमधून दहा लाखांच्या मदतनिधीची घोषणाही त्यांनी केली. 

तालुक्‍यातील चिलेवाडी व नागेवाडी या दुष्काळग्रस्त गावांना आज पवार यांनी भेट दिली आणि चिलेवाडी येथे सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासमवेत खासदार उदयनराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे आदींची विशेष उपस्थिती  होती. 

पवार म्हणाले, ‘‘पुन्हा पुन्हा येणाऱ्या दुष्काळातून मार्ग काढण्याचे गावाने ठरवले तर चमत्कार घडू शकतो, हे चिलेवाडी गावाने दाखवले आहे. या कामांना तोडच नाही. केलेल्या कामाचा फायदा चांगला पाऊस झाल्यानंतर या गावाला नक्कीच होईल. यावर्षी पाऊस थोडा लांबेल. ९२ ते ९४ टक्के पाऊस होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे; पण शिवारात पाऊस आल्याशिवाय मी अंदाजावर विश्वास ठेवत नाही; परंतु हे अंदाज ९० टक्के खरे ठरतात आणि तसे झाल्यास चिलेवाडीमध्ये झालेल्या कामांचे परिणाम पहिल्याच वर्षी दिसतील.’’

आमदार शिंदे, राजेंद्र भोसले यांनी या परिसरासाठी टॅंकरची सोय केली आहे. त्यात आणखी वाढ करण्यासाठी ‘राष्ट्रवादी’च्या ट्रस्टमधून दहा लाखांच्या निधीची व्यवस्था करू. त्यातून लोकांच्या आणि जनावरांच्याही पाण्याची व्यवस्था करा. असेही त्यांनी सांगितले.

उदयनराजे म्हणाले, ‘‘दुष्काळाच्या पाहणीसाठी सर्वत्र फिरून पवार आवश्‍यक तेथे मदत करत आहेत. या भागातील लोकांच्या मागण्या रास्त आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी मी कमी पडणार नाही. या शिवारामध्ये पाणी आणण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन.’’

‘तरीही तुम्ही दिसत नाही’
सरपंच कोण आहे, अशी विचारणा शरद पवार यांनी केल्यावर सरपंचपद रिक्त असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यावर उपसरपंचांनी पुढे यावे, असे पवार म्हणाले; परंतु पदावर असलेल्या महिला उपसरपंच पुढे येईनात, असे दिसताच ‘५० टक्के जागा दिल्या आहेत, तरीही तुम्ही दिसत नाही,’ अशी टिप्पणी पवार यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar expressed the neglect of animals is not good