Loksabha 2019 : शरद पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा: तावडे

Vinod Tawde
Vinod Tawde

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा आहे का?, असा प्रश्न शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज (गुरुवार) प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना केला.

एका वृत्त वाहिनीवर मुलाखत देताना, शरद पवार म्हणाले की, २००४ ला मनमोहनसिंग पंतप्रधान होतील, हे कोणाला वाटले नव्हते, कारण त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली नव्हती. मनमोहनसिंग त्यावेळी राज्यसभेत होते. त्यामुळे ते अचानक पंतप्रधान होऊ शकले.

या पवारांच्या विधानाचा संदर्भ देऊन तावडे म्हणाले की, यंदा शरद पवार निवडणूक लढवित नाहीत, पण ते राज्यसभेचे सदस्य आहेत. याचाच अर्थ शरद पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा आहे. ती त्यांनी बहुतेक आपल्या मुलाखतीत बोलून दाखविली असावी, असेही तावडे यांनी सांगितले.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे जे महागठबंधन आहे. त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही. तो निवडणूकीनंतर ठरेल. राहूल गांधी यांना पंतप्रधान होण्याची उत्सुकता नाही, असेही शरद पवार यांनी आपल्या मुलाखतीत म्हटले आहे. तसेच तुटलेल्या फुटलेल्या महागठबंधनमध्ये मायावती, ममता बॅनर्जी या सर्वांनाच पंतप्रधान बनण्याची इच्छा आहे. परंतु या महागठबंधनमध्ये असलेल्या गोंधळामुळे त्यांचा एक उमेदवार निश्चित होत नाही. या परिस्थितीत देशाची जनताही या गोंधळलेल्या महागठबंधनला मतदान करण्याऐवजी एनडीए महायुतीला मतदान करेल, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला.

काल अमळनेरमध्ये जी घटना भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यात घडली ती अतिशय चूकीची आहे. अशी घटना होणे, हे भाजपला शोभणारी नाही. या घटनेमागे काहीही आणि कोणतेही कारण असले, तरीही या पद्धतीची कुठलीही घटना पक्ष खपवून घेणार नाही, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये मतदार अतिशय उत्साहाने मतदानात सहभागी होत आहेत. हाच उत्साह दिवसभर टिकून राहील आणि सामान्य माणूस आपल्या देशाला योग्य वाटणाऱ्या उमेदवारांना मत देईल, मतांच्या ताकदीच्या माध्यमातून योग्य सरकार निवडून देईल, असेही तावडे यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com