Sharad Pawar: शरद पवारांच्या बोलण्याचं भाजप नेत्यांना टेन्शन; 'फडणवीस यांच्यासारख्या कार्यकर्त्यावर बोलू नये...पवार मोठे नेते | Sharad Pawar is a great leader he should not talk about an activist like Devendra Fadnavis Chandrasekhar Bawankule statement | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis Replied Sharad Pawar

Sharad Pawar: शरद पवारांच्या बोलण्याचं भाजप नेत्यांना टेन्शन; 'फडणवीस यांच्यासारख्या कार्यकर्त्यावर बोलू नये...पवार मोठे नेते

Sharad Pawar: राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाष्य केलं आहे.

शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याला बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे. शरद पवार हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. त्यांनी तरी देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या कार्यकर्त्यांवर काही बोलू नये. पवार साहेबांनी त्यांच्यावर बोलू नये असं मला वाटतं, असं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.

2 मे ला शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर 5 मे ला त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्यामागे भाजपचा कुठलाही डाव नव्हता, असं बावनकुळे म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर बोलताना बावनकुळे म्हणाले कि, अजित पवार यांचा आणि माझा मागच्या चार महिन्यापासून संपर्क झाला नाही किंवा ते आमच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात नाहीत हेच मी सांगत होतो.

त्यांच्या महाविकास आघाडीकडूनच अजित पवारांना टार्गेट केलं जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी काही तीन दिवस झाले ते सगळं स्क्रिप्टेड होतं. शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष होण्यासाठी घटना बदलली. राज्यात अशा अनेक शिक्षण आणि सहकारी संस्था आहेत. ज्यांच्या घटना बदलून शरद पवार अध्यक्ष झाले आहेत.

शरद पवार दुसऱ्याला कसं पक्षाचा अध्यक्ष होऊ देतील? राष्ट्रवादीचा तीन दिवसांचा खेळ म्हणजे नौटंकी आणि घरगुती तमाशा असल्याचंही बावनकुळे यावेळी म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय डोंबलं करणार? इथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिलगीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचं काय करायचे बघतो. अशी टीका महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निपाणीमधील सभेतून केली होती. त्यांच्या या टीकेचा शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

शरद पवार काय म्हणालेत?

कोण पार्सल आहे हे देवेंद्र फडणवीस यांना निपाणीतून सांगेन. मी निपाणीला जाणार आहे. कोण पार्सल आहे. या सगळ्या संदर्भात मी तिथे बोलणार आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता निपाणीत गेल्यानंतर शरद पवार फडणवीसांच्या टीकेला काय उत्तर देणार? याकडेच सर्वांच लक्ष असणार आहे.