शरद पवार यांचा कोल्‍हापूर दौरा अन्‌ राजकीय सर्जरी...

शरद पवार यांचा कोल्‍हापूर दौरा अन्‌ राजकीय सर्जरी...

कोल्हापूर - आंधळ्या व्यक्‍तींसमोर हत्ती उभा केला आणि त्याला हत्ती कसा आहे म्हणून विचारले. त्यांनी कधीच हत्ती पाहिलेला नसतो. त्यामुळे ज्याच्या हाताला जो अवयव लागेल तसे त्याने वर्णन सांगितले. ज्याचा हात हत्तीच्या कानाला लागला तो म्हणाला हत्ती सुपासारखा आहे. ज्याचा हात पायाला लागला त्याने हत्ती खांबासारखा असल्याचे सांगितले. या गोष्टीसारखीच काहीशी अवस्था राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्याची झाली आहे. 

पक्षातील काही मंडळी आघाडीच्या नावाखाली भाजपसोबत जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर पवार यांच्या दौऱ्याकडे लक्ष होते; पण त्यांनी आघाड्यांबाबतच्या निर्णयाला स्थानिक राजकारणाचे संदर्भ असतात, असे सांगितले. त्यामुळे भाजपसोबत जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील कळी खुलली; मात्र दौरा संपवत असताना तासाभराने खासदार पवार यांनी ‘आघाडी करताना दुसऱ्याच्या घरात डोकावू नका, सांभाळून करा, असा इशाराही दिला. भाजपसोबत जाणाऱ्यांना जाता जाता दिलेल्या इशाऱ्यामुळे भाजपसोबत जाणाऱ्यांवर नाराज असलेला गटही खूश आहे. असे असले तरी खासदार पवार यांचा दौरा गाजला तो खऱ्या अर्थाने ‘सर्जरी’ या शब्दानेच. जिल्ह्याच्या राजकारणात आता कोणाकोणाची सर्जरी होणार, याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

सत्ता आल्यानंतर भाजपने आपल्या पक्षाची दारे सर्वांसाठी खुली ठेवली आहेत. त्यामुळे साहजिकच सत्तेशिवाय जी मंडळी राहू शकत नाहीत, अशी काँग्रेस व राष्ट्रवादीमधील मंडळी त्यांच्या गळाला लागली. पक्षाच्या व्यासपीठावर नेते म्हणून हजेरी लावावी लागत असल्यामुळे काही नेत्यांची मुले थेट भाजपमध्ये जाऊ शकत नव्हती. यातून मध्यममार्ग म्हणजे स्थानिक आघाडी करण्याचा मार्ग निवडला. यातून राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या मुलांनी भाजपच्या व्यासपीठावर हजेरी लावली. खासदार पवार यांना जिल्ह्यातील संपूर्ण राजकारण नव्हे तर त्यातील बारकावे देखील माहीत आहेत. त्यामुळे भाजपशी सलगी करणारे आणि न करणारेही पवार यांच्या दौऱ्यात धास्तावले होते. कारण भाजपशी सलगी करत असताना अगोदर त्यांनी पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावर आरोप केले होते. राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ व खासदार धनंजय महाडिक यांचे आतापर्यंत आपापल्या मार्गाने काम सुरू होते; पण जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने यांच्यातीलही संघर्ष चव्हाट्यावर आला. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आघाडीबाबत खासदार महाडिक यांनी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरूनच आपली भूमिका जाहीर केली होती. यावर खासदार पवार संबंधित कार्यकर्त्यांशी बोलतील, त्यावर मलमपट्टी करतील, असे बोलले जात होते. अर्थात प्रत्येकाने श्री. पवार यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. या वेळी पवार यांनी त्यातील काही जणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, काही जणांकडे बघण्याचे टाळले.  

पक्षातील काही मंडळी भाजपसोबत आघाडी करत असल्याबद्दल विचारल्यानंतर, त्यांनी स्थानिक राजकीय परिस्थितीचे संदर्भ वेगळे असतात, असे सांगितले. त्यामुळे भाजपसोबत आघाडी करण्यास इच्छुक असणाऱ्यांच्या चेहऱ्यावरील कळी खुलली. त्यांनी आपणास आघाडी करण्यास परवानगी मिळाली, असा अर्थ काढला. यानंतर तासाभरातच सत्काराला उत्तर देताना त्यांनी चौकटीत राहून आघाडी करण्याचा इशारा दिला. त्यामुळे त्यांच्या विरोधातील गटानेही सोयीचा अर्थ काढला.

कोणाकोणाची होणार सर्जरी?
खासदार पवार यांना महाडिक व आमदार सतेज पाटील यांचे संबंध माहीत आहेतच. त्यांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत त्यांनी मार्केट यार्डमधील एका कार्यक्रमात एवढ्या खर्चात आपण राज्याची विधानसभा निवडणूक केली असती, असे विधान केले होते. या दौऱ्यात एका हॉस्पिटलच्या कार्यक्रमात मात्र त्यांनी आमदार सतेज पाटील यांचा ‘सर्जन’ म्हणून केलेला उल्लेखही गाजला. कारण याच व्यासपीठावर खासदार धनंजय महाडिक हेदेखील उपस्थित होते. त्याच्याही पुढे जात खासदार पवार यांनी आमदार पाटील यांना कोणत्या वेळी सर्जरी करायची आणि कोठे थांबायचे हे माहीत आहे, असे सांगितले; मात्र त्याच वेळी आम्हीही सर्जन आहोत. आम्ही केलेली सर्जरी जनरल वॉर्डात गेल्यानंतरच कळते, हे सांगण्यास देखील पवार विसरले नाहीत. त्यामुळे यापुढे जिल्ह्यात कोणाकोणावर सर्जरी होणार, याची चर्चा सध्या सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com