शरद पवार लोकसभा लढविणार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

मुंबई - लोकसभेच्या आगामी निवडणुकीत एकेक जागा महत्त्वाची असल्यामुळे गटबाजीच्या राजकारणात पराभवाचा चटका बसू नये, यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार स्वत: लोकसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उद्याच्या (ता. १४) बैठकीत यावर शिक्‍कामोर्तब केले जाण्याची शक्‍यता आहे. 

मुंबई - लोकसभेच्या आगामी निवडणुकीत एकेक जागा महत्त्वाची असल्यामुळे गटबाजीच्या राजकारणात पराभवाचा चटका बसू नये, यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार स्वत: लोकसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उद्याच्या (ता. १४) बैठकीत यावर शिक्‍कामोर्तब केले जाण्याची शक्‍यता आहे. 

माढा या लोकसभा मतदारसंघात ‘राष्ट्रवादी’ला हमखास विजयाची खात्री आहे. मात्र, विद्यमान खासदार विजयसिंह (दादा) मोहिते पाटील व ‘राष्ट्रवादी’चे स्थानिक नेते संजय (मामा) शिंदे यांच्यात कमालीची गटबाजी आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास संजय शिंदे बंड करण्याची भीती आहे. त्यामुळे, या स्थानिक नेत्यांमधील गटबाजी रोखण्यासाठी शरद पवार यांनाच मैदानात उतरवण्याची रणनीती ‘राष्ट्रवादी’ने आखल्याचे मानले जाते. 

माढा लोकसभेची जागा शरद पवार यांनी लढवावी, अशी आमची मागणी असल्याचे ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज स्पष्ट केले. शरद पवार यांनी उद्या ‘राष्ट्रवादी’च्या प्रमुख नेत्यांची सकाळी ११ वाजता बैठक बोलावली आहे. त्यात पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभेला उमेदवार व्हावे, यावर चर्चा होण्याचे संकेत आहेत. त्याबरोबरच काँग्रेस सोबतच्या जागावाटपाचे सूत्र अंतिम होणार असून, प्रचाराची रणनीतीदेखील आखली जाणार आहे. 

शरद पवार माढा लोकसभेतून उमेदवार राहणार असतील, तर नाशिकमधून छगन भुजबळ, ठाणे येथून गणेश नाईक, शिरूरमधून दिलीप वळसे पाटील यांना उमेदवार म्हणून उतरवले जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

आघाडीची सध्या जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभा लढवावी, याबाबत चर्चा सुरू असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. यामुळे, ज्येष्ठ नेत्यांना आता लोकसभेच्या रणांगणात उतरवण्यासाठी अंतिम निर्णय ‘राष्ट्रवादी’त होण्याची शक्‍यता आहे.

इतर पक्षांच्या नेत्यांशी आता चर्चा होणार नाही. भेटीगाठीचे पर्व संपले आहे. आता जागावाटपावरच चर्चा सुरू आहे. मित्रपक्ष एकत्र यावेत, असे आम्हाला वाटते. 
- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: Sharad Pawar Loksabha Election Politics