
Sharad Pawar : पवारांच्या कानपिचक्या निष्फळ! काँग्रेसने पुन्हा सावरकरांचा मुद्द्यावर केला भाजपला सवाल
वीर सावरकर यांच्याबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत राडा झाला होता. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस आमने-सामने आली होती. त्यामुळे आघाडीत दरार पडल्याची चर्चा होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: मैदानात उतरले होते. त्यांनी दिल्लीत बैठक घेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर राहुल गांधी व मल्लिकाअर्जून खर्गे यांनी पवार यांच्या मताशी सहमती दर्शवली.
पुढे सावरकर यांच्यावर बोलणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र काँग्रेस नेत्यांना शरद पवार यांची भूमिका मान्य नसल्याचे चित्र राज्यात दिसत आहे.
शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर वीर सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा आवाज मवाळ होण्याची चर्चा होती. मात्र सावरकर आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव घेऊन काँग्रसने पुन्हा एकदा भाजपला प्रश्न विचारला आहे. सावरकरांच्या नावाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस मध्ये वाढत्या वादात शरद पवार यांनी हे प्रकरण हाताळले होते.
काँग्रेस नेते पवन खेरा यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत घेतली. वीर सावरकरांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जे बोलले ते भाजपला मान्य आहे का, असा सवाल त्यांनी केला आहे. भाजपने आधी याचे उत्तर द्यावे, नंतर इतर विषयांवर चर्चा होईल. महाविकास आघाडीमध्ये वैचारिक मुद्द्यांवर मतभेद असू शकतात, पण याचा अर्थ पक्षांमध्ये फूट पडली असे नाही, असेही खेरा यांनी स्पष्ट केले.
दिल्लीत बैठकित काय घडले होते -
महाराष्ट्रात आदरणीय असलेल्या सावरकरांना लक्ष्य केल्याने महाविकास आघाडीला मदत होणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. या बैठकीला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेतेही उपस्थित होते. शिवसेना या बैठकीत हजर नव्हती.
वीर सावरकर यांना माफिवीर म्हणणे देखील योग्य नसल्याची भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे. त्यामुळे काँग्रेस देखील एक पाऊल मागे आली होती. सावरकरांबाबत काँग्रेसने आपली भूमिका मवाळ करण्यास सहमती दर्शवल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले. तसेच कोणाच्या भावना दुखवणार असतील तर आपण या मुद्द्यांवर टीका करणार नाही, असे देखील राहूल गांधी यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकर एक नाहीत. त्यांच्या भूमिका वेगळ्या होत्या. त्यामुळे त्यांना माफीवीर म्हणणे योग्य नाही, अशी ठाम भूमिका शरद पवार यांनी घेतली. याला बैठकीत दुजोरा देखील मिळाला. त्यामुळे शरद पवार यांनी महाविकास आघाडी फुटण्यापासून वाचवली आहे. शरद पवार यांच्या भूमिकेचा मी सन्मान करतो असे, राहुल गांधी म्हणाले.