
Sharad Pawar : '...मग क्रांती झाल्यावरच बघू' नार्वेकरांच्या विधानावर शरद पवार थेट बोलले
नवी दिल्लीः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. संघटनेतील बदल, विरोधकांची एकजुट आणि राज्यातली धार्मिक दुही यावर पवारांनी भाष्य केलं.
आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी पक्षाच्या कार्याध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड करण्यात आली आहे. या निर्णयानंतर अजित पवार नाराज होतील, असं बोललं जात आहे. परंतु शरद पवारांनी याबद्दल भूमिका स्पष्ट केली. अजित पवारांकडे महाराष्ट्रातील जबाबदारी असल्याने त्यांना इतर जबाबदारी देण्यात आली नसल्याचं पवार म्हणाले.
काय म्हणाले शरद पवार?
धार्मिकतेच्या मुद्द्यावर बोलतांना शरद पवार म्हणाले की, भाजप आणि त्यांचे सहकारी पाहिजे ते करत आहेत. कर्नाटकात हनुमानाचं नाव घेऊन त्यांनी हेच केलं होतं. मात्र लोकांनी ते स्वीकारलं नाही. सांप्रदायिक विवाद करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु लोक त्यांना आता स्वीकारणार नाहीत.
विरोधकांची एकजुट
शरद पवार पुढे म्हणाले की, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत बातचित झाली. मिळून पुढे काम करण्यासंदर्भात चर्चा झाली. लोकांना बदल पाहिजे आहे. त्यामुळे त्यासाठी काम करावं लागेल. कार्याध्यक्ष निवडीवर पवार म्हणाले की, एक महिन्यापूर्वी आमच्या सहकाऱ्यांनी हे प्रपोजल मांडले होतं. सुप्रिया सुळेंची निवड हा माझ्या एकट्याचा निर्णय नाही. त्यामुळे त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली.
यावेळी शरद पवारांना राहुल नार्वेकर यांच्याविषयी एक प्रश्न विचारण्यात आला. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले होते की, लवकरच क्रांतीकारी निर्णय घेणार आहे. यावर पवार म्हणाले, मी कसं सांगणार ते काय करणार आहेत ते. याबद्दल मला काहीही माहिती नाही. विधानसभा क्षेत्रात मी लक्ष देत नाही. परंतु ते काही क्रांतीकारी निर्णय घेणार असतील तर क्रांती झाल्यानंतर त्यासंदर्भात बघू.