पवारांच्या संसदीय कारकिर्दीचा सुवर्णमहोत्सव 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

पुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बुधवारी संसदीय कारकिर्दीचा सुवर्णमहोत्सव साजरा केला. पाच दशकांपूर्वी 22 फेब्रुवारी 1967 रोजी शरद पवार बारामती मतदारसंघातून प्रथमच बहुमताने निवडून महाराष्ट्राच्या विधानसभेत गेले. अखंडितपणे सलग पन्नास वर्षे देशाच्या संसदीय व्यवस्थेत काम करणारा नेता, असा अनोखा विक्रम पवारांच्या नावावर आज नोंदला गेला. 

पुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बुधवारी संसदीय कारकिर्दीचा सुवर्णमहोत्सव साजरा केला. पाच दशकांपूर्वी 22 फेब्रुवारी 1967 रोजी शरद पवार बारामती मतदारसंघातून प्रथमच बहुमताने निवडून महाराष्ट्राच्या विधानसभेत गेले. अखंडितपणे सलग पन्नास वर्षे देशाच्या संसदीय व्यवस्थेत काम करणारा नेता, असा अनोखा विक्रम पवारांच्या नावावर आज नोंदला गेला. 

तेराव्या राज्य विधिमंडळामध्ये शरद पवार आजच्या दिवशी सर्वप्रथम आमदार म्हणून निवडून येऊन संसदीय कारकिर्दीला सुरवात केली होती. पवार यांनी गेल्या वर्षी पंचाहत्तरी ओलांडली. नुकतेच "पद्मविभूषण'ने सन्मानित झालेल्या पवार यांनी चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. देशाचे संरक्षणमंत्री, कृषिमंत्री म्हणून काम करताना या पदांना त्यांनी नवी उंची गाठून दिली. संसदीय कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने शरद पवार यांनी फेसबुकवरून महाराष्ट्रातील जनतेचे ऋण व्यक्त केले आहे. पवार यांनी आपल्या पहिल्या आमदारकीची शपथ 23 मार्च 1967 रोजी घेतली होती. 

यशवंतरावांची खंबीर साथ 
पवारांना पहिल्यांदा मिळालेल्या उमेदवारीबाबतचा किस्सा आजही चर्चिला जातो. सत्ताविसाव्या वर्षी तरुण शरद पवार यांनी कॉंग्रेसकडे उमेदवारी मागितली; परंतु बारामतीतल्या प्रस्थापित कॉंग्रेस नेत्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. उमेदवारीसाठी आलेल्या बारा अर्जांपैकी अकरा जणांनी आमच्यापैकी कोणालाही तिकीट द्या, पण पवार नकोत, असा आग्रह यशवंतराव चव्हाणांकडे धरला. त्या वेळच्या जिल्हा कॉंग्रेसनेही पवार निवडून येणार नसल्याचा अहवाल यशवंतरावांना दिला. मुलाखती सुरू असताना यशवंतरावांनी बारामतीच्या कॉंग्रेस नेत्यांना प्रश्न केला, की राज्यात आपल्याला किती जागा मिळतील. तेव्हा 190 ते 200, असे उत्तर समोरून आले. म्हणजे आपले 88 उमेदवार पडतील तर आणि यात बारामतीची आणखी एक जागा गेली असे समजा, असे म्हणत चव्हाण यांनी पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी पवार आमदार म्हणून निवडून गेले. 

मी या 50 वर्षांत बरेच चढ-उतार पाहिले; अनेक आव्हानांना सामोरे गेलो; परंतु सर्वसामान्यांची खंबीर साथ आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा यांच्या जोरावर सार्वजनिक जीवनात कार्य करू शकलो. यापुढेही मी कष्टकरी, शेतकरी, कामगार, महिला, उपेक्षित आणि नवी पिढी समोर ठेवून कार्य करीत राहील आणि त्यांच्या ऋणात आयुष्यभर राहणे पसंत करीन. 
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस 
 

Web Title: sharad pawar parliamentary career Golden jubilee