शरद पवार पुन्हा ठरले संकटमोचक!, महाविकास आघाडी फुटण्यापासून वाचवली -Sharad Pawar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

Sharad Pawar : शरद पवार पुन्हा ठरले संकटमोचक!, महाविकास आघाडी फुटण्यापासून वाचवली

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर टीका केल्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा होती. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने याबाबत आपली नाराजी काँग्रेस नेतृत्वापर्यंत पोहोचवली होती. तसेच एकत्र राहायचे असल्याचे सावरकरांवर वक्तव्य बंद करा, असा इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत तणाव होता. मात्र आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संकटमोचक ठरले आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महाविकास आघाडीतील नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. काँग्रेसने सावरकरांवर केलेल्या टीकेमुळे मित्रपक्ष, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काल (सोमवार) संध्याकाळी बोलावलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत शरद पवारांनी हा मुद्दा उपस्थित केला. 

महाराष्ट्रात आदरणीय असलेल्या सावरकरांना लक्ष्य केल्याने महाविकास आघाडीला मदत होणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. या बैठकीला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेतेही उपस्थित होते. शिवसेना या बैठकीत हजर नव्हती. 

वीर सावरकर यांना माफिवीर म्हणणे देखील योग्य नसल्याची भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे. त्यामुळे काँग्रेस देखील एक पाऊल मागे आहे. सावरकरांबाबत काँग्रेसने आपली भूमिका मवाळ करण्यास सहमती दर्शवल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले. तसेच कोणाच्या भावना दुखवणार असतील तर आपण या मुद्द्यांवर टीका करणार नाही, असे देखील राहूल गांधी यांनी म्हटले आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकर एक नाहीत. त्यांच्या भूमिका वेगळ्या होत्या. त्यामुळे त्यांना माफीवीर म्हणणे योग्य नाही, अशी ठाम भूमिका शरद पवार यांनी घेतली. याला बैठकीत दुजोरा देखील मिळाला. त्यामुळे शरद पवार यांनी महाविकास आघाडी फुटण्यापासून वाचवली आहे. शरद पवार यांच्या भूमिकेचा मी सन्मान करतो असे, राहुल गांधी म्हणाले. 

बैठकीत काय झाले ?

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शिवनेने बहिष्कार टाकला. या बैठकीत शरद पवार आणि राहुल गांधी उपस्थित होते. शरद पवार यांना माफीवीर म्हणणे योग्य नाही, अशा स्पष्ट शब्दात शरद पवार यांनी भूमिका मांडली. संघ आणि सावरकरांचा संबंध नाही, असे देखील शरद पवार यांनी राहुल गांधी यांना सांगितले. यावर मल्लिकाअर्जून खर्गे यांनी पवारांच्या मताला दुजोरा दिला. 

राहुल गांधी यांनी देखील मी पवारांच्या मताचा आदर करतो, असे सांगितले. कुणाचे भावना दुखावणार असतील तर मी टीका करणार नाही, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.