Loksabha Election 2019 : आजोबा, तुम्ही पुन्हा विचार करा; शरद पवारांना दुसऱ्या नातवाची गळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 मार्च 2019

रोहीत यांनी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच हवेवर सत्तेवर आलेल्या पवार विरोधकांनी बेडकासाखे फुगून वक्तव्ये करू नका, असेही आव्हान दिले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व पवार यांचे नातू रोहीत पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांनी निवडणूक न लढविण्याचे काल जाहीर केले होते. त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच रोहीत यांनी फेसबुक पोस्टद्वारे काल शरद पवार यांची निवडणूकीतून माघारी याविषयी लिहीले आहे. तसेच अजित पवार यांचे पुत्र व शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांना मावळ मधून लढता यावे यासाठी आजोबा शरद पवार यांनी निवडणूकीतून माघारी घेतली असल्याची चर्चा आहे. पण त्यांचे दुसरे नातू रोहीत यांनी मात्र आजोबांनी निवडणूक लढवावी अशी ईच्छा व्यक्त केली आहे. 

रोहीत यांनी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच हवेवर सत्तेवर आलेल्या पवार विरोधकांनी बेडकासाखे फुगून वक्तव्ये करू नका, असेही आव्हान दिले आहे. 

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये ते म्हणतात, 'राजकारणातले मोठमोठ्ठे लोक साहेबांच्या राजकारणाचा गौरव करत असताना काय म्हणतात हे आपणाला माहितच आहे. पण सर्वसामान्य लोकं काय म्हणतात याकडे पवार साहेब नेहमीच लक्ष देतात. म्हणूनच गेली 52 वर्षे फक्त राजकारणच नाही तर समाजकारणात देखील हिच एकमेव व्यक्ती आमच्यासाठी उभा राहू शकते अस सर्वसामान्य माणसांच मत आहे. 

 

sharad pawar rohit pawar

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या सहवासातून सुरू झालेला साहेबांचा हा प्रवास भेदभावाचं, जातीधर्माचं राजकारण न करता, गेली 52 वर्ष न थकता सर्वसामान्यांसाठी सुरू आहे, म्हणूनच पवार साहेबांच राजकारण कोणत्या हवेवर नाही तर सर्वसामान्यांच्या घरातून चालू होतं. हे मला स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या दिवशीच अभिमानाने सांगू वाटतं,' असं रोहीत यांनी म्हटलं आहे.

'एक कार्यकर्ता म्हणून, साहेबांच्या प्रत्येक निर्णयाचा आदर हा असणारच आहे, पण या आदरच्या पुढे प्रेम असतं. आणि माझं आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच प्रेम म्हणून आमच्या प्रत्येकाच हेच मत आहे की, साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा,' असे आवाहन त्यांनी केले. 

तसेच 'बाकी राहता राहिला हवेतून पदावर बसलेल्या लोकांचा विषय तर साहेबांबद्दलच आपलं वक्तव्य हे शेवटच असू द्या, तसही बेडकासारखं हवा भरून बैल होण्याच्या नादात आपण फुटणार होताच. पण अशी वक्तव्यं करत राहिलात तर हवा भरण्याच्या आतच फुटाल,' असाही इशारा त्यांनी दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar should rethink on his decision of not contesting election says grandson rohit pawar