आमचे सरकार पाच वर्षे टिकेल - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

मुख्यमंत्र्यांच्या नावावर चर्चा सुरू
महाशिवआघाडीचा मुख्यमंत्री कोण राहील या प्रश्‍नावर पवार म्हणाले की, ‘‘ त्याबाबत माझी चर्चा सुरू आहे. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी आघाडीच्या प्रमुख नेत्यांचा एक चमू तयार करण्यात आला आहे. ते जे ठरवतील ते सर्वांना मान्य राहील. मला त्याबाबत बोलण्याचा अधिकार नाही. सरकार केव्हा स्थापन होईल हेही मी सांगू शकत नाही.’

नागपूर - शिवसेना आणि आमची विचारसरणी वेगवेगळी असली तरी, सरकार चालवण्यासाठी किमान समान कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यामुळे हे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. हे सरकार पाच वर्षे टिकावे म्हणून आपण स्वतः लक्ष घालू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका नेहमीच धर्मनिरपेक्ष राहिलेली आहे. याकरिताच शिवसेनेसोबत आघाडी करताना किमान समान कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. विकासाभिमुख धोरणे राबविण्याबरोबरच  रोजगारासंबंधीच्या समस्या आणि लोकांचे प्रश्‍न सोडविण्याची आमची मनापासून इच्छा आहे. मुख्यमंत्री कोण राहील आणि सरकार केव्हा स्थापन होईल, हे मी सांगू शकत नाही. तीनही पक्षाचे नेते एकमेकांसोबत चर्चा करीत आहेत. तेच काय ते ठरवतील. मात्र, सरकार पाच वर्षे टिकेल आणि मध्यावधीची कुठलीही शक्‍यता नसून, पाच वर्षे स्थिर सरकार देण्याचा आम्ही प्रयत्न करू,’’ असेही पवार यांनी सांगितले. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचेच सरकार येणार असल्याचा दावा करीत आहेत. याबाबत विचारले असता पवार म्हणाले, मी त्यांना चांगला ओळखतो. ते भविष्यवेत्तेसुद्धा आहेत. प्रचारादरम्यान ते ‘मी पुन्हा येणार ...मी पुन्हा येणार...’ असे सांगत होते. आता भाजपचे सरकार येणार असे म्हणत आहेत.’’  असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला.

भाजपने राज्यात १०५ जागा जिंकल्या असून आमच्या पक्षाला एक कोटी ४२ लाख मते मिळाली आहेत, त्यामुळे भाजपच्या नेतृत्वातच राज्यामध्ये सरकार स्थापन होईल.
- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar talking