खंबीर राहा, पक्ष तुमच्यासोबत आहे - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या शिवसेनेतील प्रवेशाच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी वरळीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. खंबीर राहा, पक्ष तुमच्यासोबत आहे; नागरिकांची कामे सुरूच ठेवा, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या शिवसेनेतील प्रवेशाच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी वरळीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. खंबीर राहा, पक्ष तुमच्यासोबत आहे; नागरिकांची कामे सुरूच ठेवा, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. 

वरळीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांनी कार्यकर्त्यांकडून वरळी विधानसभा मतदारसंघातील सद्यःस्थितीची माहिती घेतली. कार्यकर्त्यांनी आपली गाऱ्हाणी मांडली. अहिर यांनी शिवसेनेत जाण्यापूर्वी विश्‍वासात घेतले नव्हते, असा राग कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या वेळी अहिर यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे वरळी कोळीवाडा, बीडीडी चाळ, ५२ चाळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

पवार यांच्या भेटीदरम्यान काही कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी परिसरातील परिस्थिती पक्षाध्यक्षांच्या कानावर घातली. एवढ्या मोठ्या संख्येने स्थानिक पदाधिकारी आल्यामुळे पवार यांनी आनंद व्यक्त करून त्यांना धीर दिला. जनहिताचे कार्य असेच सुरू ठेवा, असा संदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar Talking NCP Politics