
Sharad Pawar: एकजुटीसाठी प्रयत्न करणाऱ्या विरोधी पक्षांना शरद पवारांचा इशारा; म्हणाले...
संभाजीनगर : केंद्रातील भाजपप्रणित एनडीए सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांचे एकजुटीसाठी प्रयत्न सुरु आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. तसेच देशातील सध्याच्या राजकारणावरही त्यांनी भाष्य केलं आहे. संभाजीनगर इथं आयोजित सौहार्द बैठकीत ते बोलत होते. (Sharad Pawar warning to opposition parties who trying for unite against Modi govt)
पवार म्हणाले, "माझा देशातील सामान्य माणसावर विश्वास आहे. आम्हा राजकारण्यांपेक्षा देशातील सामान्य माणूस हा अधिक शहाणा आहे. आम्ही चुकीच्या मार्गाला गेलो की, लोक शहाणपणाचा रस्ता दाखवतात. १९७७ साली आपण पाहिलं की इंदिरा गांधींसारखे जबदरस्त लोकप्रिय नेतृत्व असतानाही संसदीय लोकशाहीला बाजूला ठेवण्याची भूमिका जेव्हा त्यांनी घेतली तेव्हा त्यांचा पराभव देशातील सामान्य जनतेने केला" (Latest Marathi News)
संसदीय लोकशाही पद्धत दुबळी करणं हे आम्ही मान्य करणार नाही हे लोकांनी दाखवून दिलं. त्यानंतर ज्यांच्या हाती सत्ता दिली त्यांना कारभार जमत नाही हे जेव्हा जनतेच्या लक्षात आलं, तेव्हा पुन्हा एकदा त्यांच्या हातून जनतेनं सत्ता इंदिराजींच्या हाती दिली.
लोक शहाणपणाचे निकाल घेत असतात. देशात आजचं चित्र पाहिलं तर केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, झारखंड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल येथे भाजपचं राज्य नाही. त्यामुळं बहुसंख्य राज्यात लोकांनी शहाणपणाचा निकाल घेतला आहे, असंही पवार यावेळी म्हणाले. (Marathi Tajya Batmya)
संस्थांवर हल्ला करणारे राज्यकर्ते आम्हाला नको असा निर्णय जनतेने घेतला आहे. त्यामुळं आपण काही वेगळे होईल याची चिंता करण्याचे कारण नाही, फक्त जागरुक राहण्याची गरज आहे. विरोधी पक्ष एकत्रित येऊन लोकांना विश्वासदर्शक पर्याय देण्यात यशस्वी झाले तर लोक निश्चित वेगळा विचार करतील.
पण यात जर आम्ही शहाणपणाने वागलो नाही तर कदाचित लोक पर्याय म्हणून दुसरा विचार करणार नाहीतच, असं म्हणता येणार नाही. त्यामुळं एकंदरीत चित्र काळजी करण्यासारखं आहे, असंही पवार यावेळी म्हणाले.