भाजपला मदत करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर कारवाई: पवार

रविवार, 30 डिसेंबर 2018

नगर महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मदत करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांवर चौकशी करून पुढील पाच दिवसांत कारवाई करणार असल्याचे संकेत आज (रविवाऱ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. नगरसेवकांनी पक्षादेश झुगारुन भाजपला मदत केली असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

नगर : नगर महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मदत करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांवर चौकशी करून पुढील पाच दिवसांत कारवाई करणार असल्याचे संकेत आज (रविवाऱ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. नगरसेवकांनी पक्षादेश झुगारुन भाजपला मदत केली असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

नगरमधील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या कार्यक्रमानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. पुढे ते महापालिकेच्या विषयावर बोलताना म्हणाले की, पक्षादेश झुगारून येथील नगरसेवकांनी भाजपला महापालिकेत मदत केलेली आहे, राज्याच्या अध्यक्षांसोबत बोलून येत्या पाच दिवसांत चौकशी करून बंड करणाऱ्या नगरसेवकांवर कडक कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाला पाठींबा दिल्याने अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांवर येत्या 4 ते 5 दिवसामध्ये कारवाई करणार असल्याचे पवार यांनी अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत सांगितले. पवार म्हणाले, नगरच्या झालेल्या निवडणुकीसंदर्भात सर्व माहिती मागितली आहे. पक्षाने आदेश देऊनही निर्णय धुडकावला आहे. ही बाब गंभीर आहे. त्यामुळे पक्षाची बैठक 4 किंवा 5 जानेवारी 2019 रोजी होईल. या बैठकित कारवाईचा निर्णय  घेण्यात असल्याचे पवार म्हणाले. शहर जिल्हाध्यक्षांकडे अहवाल मागितल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांच्या पाठिंब्यावर अहमदनगर पालिकेत भाजपचा महापौर व उपमहापौर निवडून आला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची जाहीर युती दिसून आली. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला या घटनेचा फटका बसण्याची शक्यता असल्याने नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे. पाठींबा देण्याचा निर्णय माझा व नगरसेवकांचा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी काल जाहीर केले होते. 

दरम्यान, नगर महानगर पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले असून, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगपात यांनी राष्ट्रवादी भाजपला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचे म्हटले होते. अहमदनगर महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या नगरी दणक्‍याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी घायाळ झाल्याचे चित्र दिसून आले होते. "राष्ट्रवादी'चे आमदार संग्राम जगताप यांच्या गटाला भाजपने सत्तेच्या सावलीत खेचताना त्यांच्यावर असलेल्या गंभीर फौजदारी गुन्ह्यांना बगल देत अभद्र युतीच्या सत्तेचे शिखर गाठले होते. चौथ्या क्रमांकाचे नगरसेवक असतानाही भाजपने राष्ट्रवादी व बसपच्या सोबतीने महापौरपद मिळविले होते.

Web Title: Sharad Pawars announcement will take action against NCP corporators in the city