ईडीच्या कारवाईनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली असून माझं नाव यादीत असेल तर मी या गोष्टीचे स्वागतच करतो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

मुंबई : निवडणूकीच्या तोंडावर अजित पवारांसह इतर 70 जणांविरुद्ध ईडीने गुन्हा दाखल केला आहे. या यादीत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचेही नाव आहे. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली असून माझं नाव यादीत असेल तर मी या गोष्टीचे स्वागतच करतो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांनी म्हटले की, माझ्याविरुद्ध कुठलाही गुन्हा दाखल नसताना माझे नोटीसमध्ये नाव असेल तर मी स्वागतच करतो, मी त्यावेळी संचालक नव्हतो. माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल नाही, मला तुरुंगात जाण्याची भीती नाही असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

निर्णयाचा म्हणून जो फोटो आहे, तो तक्रारीचा आहे. निर्णयाचा नाही. ज्या बँकेचा संदर्भ दिला जात आहे, त्या बँकेचा मी सभासदही नाही. कोणत्याही आर्थिक देवाणघेवाणीशी माझा संबंध नाही. नुकत्याच झालेल्या सोलापूर, सातारा दौऱयात राष्ट्रवादी पक्षाला तरूणांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची वागणूक राज्य सरकारकडून अपेक्षितच होती.  निवडणुकीच्या तोंडावर मुंबई पोलिस किंवा ईडी अशा संस्थांच्या कारभाराशी माझा संबंध नसताना नाव गोवत असेल, तर राज्य सरकारच्या कारभाराबाबत शंका उपस्थित करण्यास वाव आहे.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. ईडीने गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये अजित पवार यांच्यासह 70 माजी संचालकांचा समावेश आहे. ईडीच्या या कारवाईनंतर शरद पवारांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. सहकारी बँकेवर अनियमितता केल्याचा आरोप होता. राज्यभरात माझे सुरु असलेले दौरे सुरुच राहतील, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawars reaction after ED notice