तिने हिरॉईन बनण्यासाठी सोडलं घर अन्‌..

विठ्ठल लांडगे
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

वडील आपल्या स्वप्नाच्या आड येत असल्याचा तिचा समज झाला अन्‌ त्याच रागातून तिने घर सोडलं. कपड्यांची बॅग भरून ती घरातून पळाली. पुढं जे घडलं, ते अजबच होतं.
 

नगर : तिला हिरॉईन बनायचं होतं. ती रोज तेच स्वप्न रंगवायची. हिंमत करून तिने वडिलांनाही मनातील विचार सांगितला; पण अकरावीत शिकणाऱ्या या मुलीस त्यांनी अभ्यासात लक्ष घालण्याचा सल्ला दिला. वडील आपल्या स्वप्नाच्या आड येत असल्याचा तिचा समज झाला अन्‌ त्याच रागातून तिने घर सोडलं. कपड्यांची बॅग भरून ती घरातून पळाली. पुढं जे घडलं, ते अजबच होतं.

सावेडीतील जॉगिंग ट्रॅकच्या मैदानावर आज पहाटे गोंधळ सुरू होता. दहावी-अकरावीच्या वयातील एक मुलगी हमसून रडत होती. अधूनमधून येणाऱ्या तिच्या हुंदक्‍यांकडे "मॉर्निंग वॉक'ला आलेल्यांचं लक्ष जात होतं; मात्र सुरवातीला तिची कोणी फारशी दखल घेतली नाही. जॉगिंग ट्रॅकवरील बाकावर बसलेल्या त्या मुलीकडे कोणाचे फारसे लक्ष जाण्याचे कारणही नव्हते. मात्र, ती अधूनमधून रडत होती. ट्रॅकवर चालणाऱ्या एका सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्याच्या लक्षात हे आले. त्याने सुप्रभात ग्रुपचे सदस्य व सेवानिवृत्त प्राध्यापक अविनाश मुंडके यांच्या कानावर हे घातले.

मुंडके यांनी ही बाब मैदानाच्या पूर्व बाजूला व्यायाम करणाऱ्या महिलांच्या निदर्शनास आणून दिली. महिलांना "त्या' मुलीची चौकशी करायला सांगितले. उपस्थित महिलांनीही तिची आस्थेने चौकशी केली. मात्र, ती काही सांगण्याऐवजी रडतच राहिली. "कुठून आली, तुझं घर कुठे आहे,' अशा प्रश्‍नांनाही ती उत्तरे देत नव्हती. तिच्या हातातील मोबाईलही "लॉक' असल्याने तिच्या पालकांशी संपर्क करता येईना. त्या वेळी सुप्रभात ग्रुपचे सदस्य असलेले ज्येष्ठ पत्रकार घटनास्थळी व्यायामासाठी आले. त्यांनी घटनाक्रम समजून घेतल्यानंतर तातडीने तोफखाना पोलिस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षक राजेंद्र गर्गे यांच्याशी संपर्क केला.
अवघ्या काही मिनिटांत ते कॉन्स्टेबल अनिल भोसले यांच्यासह घटनास्थळी आले.

"त्या' मुलीस घेऊन तोफखाना पोलिस ठाण्यात गेले. ती लोकांना पुण्याची असल्याचे सांगायची, तर कधी आणखीच वेगळं कारण सांगून टाळाटाळ करीत होती. मात्र, ती निघाली भुतकरवाडीतील. तिला विश्‍वासात घेऊन पालकांचा मोबाईल क्रमांक मिळविला. त्यानंतर उलगडा झाला. तिचे पालक तातडीने ठाण्यात आले.

वडिलांशी वादानंतर उचललं पाऊल
त्या मुलीला बॉलिवूडमध्ये करिअर करायचं होतं. अगोदर अभ्यासात लक्ष घाल, नंतर पाहू, अशी समजूत तिचे पालक घालायचे. मात्र, ती ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. त्याच वेडातून ती पहाटे घराबाहेर पडली. कुठे जावं, काय करावं, हे तिला नसल्याने ती जॉगिंग ट्रॅकवर आली होती. सुप्रभात ग्रुप आणि पत्रकारांनी प्रसंगावधान साधत तिला पोलिसांच्या हवाली केलं. पोलिसांनी तिची समजूत काढल्याने वडिलांसोबत घरी परतली. एव्हाना आपलं चुकल्याचंही तिच्या लक्षात आलं.

अलीकडे पालक व मुलांमधील संवाद हरवत चालला आहे. मोबाईलच्या अतिरेकी वापराने ही स्थिती ओढवली आहे. त्यामुळे हरवत चाललेल्या समाजव्यवस्थेत मुलांसोबत आता पालकांच्याही समुपदेशनाची गरज आहे. विशेष म्हणजे, सोशल मीडियाचा अतिरेकी वापर कसा कमी करता येईल, यावरदेखील विचारमंथनाची गरज आहे.
- डॉ. संजय कळमकर
साहित्यिक आणि समाजशास्त्रज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: She left home to become a heroine ..