Sheetal Mhatre Video : शितल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी SIT ची घोषणा; शंभुराज देसाईंची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sheetal mhatre prakash surve video case SIT inquiry announced in Sheetal Mhatre viral video case shambhraj desai

Sheetal Mhatre Video : शितल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी SIT ची घोषणा; शंभुराज देसाईंची माहिती

Sheetal Mhatre Video case : शिवसेना प्रवक्त्या शितल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटातील नेत्यांवर केला जात आहे.

यानंतर आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता शितल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी SIT मार्फत चौकशी केली जाणार आहे. शंभुराज देसाई यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

शितल म्हात्रे यांनी काल पत्रकार परिषद घेत हा मॉर्फ केलेला व्हिडीओ आहे, कोणीतरी जाणून हा एडीट केलेला व्हिडीओ व्हायरल केल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज विघानभवनात देखील या प्रकरणाचे पडसाद उमटले होते. त्यानंतर आता या प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी होणार असल्याची घोषणा शंभुराज देसाई यांनी केली आहे.

विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील या प्रकरणातील सत्य काय आहे ते बाहेर आले पाहिजे अशी मागणी केली होती. भाजप-शिवसेनेच्या महिला आमदारांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही याविषयावर रोखठोक भाष्य केलं.

विरोधी पक्षनेते अजित पवार या प्रकरणावर बोलताना म्हणाले की, "राजकीय क्षेत्रात असो किंबहुना कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना स्वतःचं चारित्र्य जपणं खूप महत्त्वाचं असतं. कारण सर्वसामान्य लोक आमच्याकडे 'पब्लिक फिगर' म्हणून पाहत असतात. एकवेळ राजकीय मतं वेगवेगळी असू शकतात, मतमतांतरं असू शकतात. त्याबद्दल मला खोलात जायची गरज नाही. मात्र, कुठल्याही लोकप्रतिनिधीने काही केलं नसताना कुणी जाणीवपूर्वक असे प्रकार केले आहेत का? त्यामागे कुणी मास्टरमाईंड आहे का? याची चौकशी झाली पाहिजे."

तर पुढे बोलताना ते म्हणाले की, म्हणून माझं तर स्पष्ट मत आहे, एखाद्या महिलेची बदनामी नको. त्या व्हिडीओची स्पष्टपणे चौकशी करुन 'दूध का दूध, पाणी का पाणी' झालं पाहिजे. वस्तूस्थिती काय आहे हे लोकांना आणि सभागृहाला कळली पाहिजे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

काय आहे व्हिडिओ व्हायरल प्रकरण?

गोरेगाव इथे शनिवारी (11 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे सहभागी झाले होते.

या रॅलीमध्ये शीतल म्हात्रे या जीपमध्ये असताना त्यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ हा मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला आहे. बदनामी करण्यासाठी हा व्हिडीओ मॉर्फ करुन ठाकरे गट आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तो व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. या प्रकरणात पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.