
Ajit Pawar: 'तेव्हापासूनच त्यांना भाजपमध्ये यायचं होतं', शिंदे गटाच्या दाव्यानं अजितदादा अडचणीत?
राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार राज्याच्या राजकारणात केंद्रबिंदू ठरले होते. अशातच अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. त्यानंतर अजित पवार, शरद पवार यांनी यासंबधी स्पष्टीकरण दिलं आणि या चर्चेला पूर्णविराम मिळाला. अशातच आज शिवसेना (शिंदे गट)नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी अजित पवारांसंबधी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिरसाट यांच्या या गौप्यस्फोटामुळं चर्चेला उधाण आलं आहे. शिरसाट बोलताना म्हणाले की, 'आम्ही 2019 ची निवडणूक युतीत लढलो होतो. निकालानंतर आम्ही सर्व आमदार मातोश्रीवर गेलो. आम्ही तिथे गेल्यावर आम्हाला समजलं की आम्हाला भाजपसोबत जायचं नाही, मात्र आमचे सुरुवातीपासून म्हणणे होते की, भाजपसोबत जावे.
अजित पवार हे देखील आधीपासूनच भाजपसोबत जायला तयार होते, असा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केला आहे. शिरसाट यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
संजय शिरसाट यांची मंत्रिमंडळ विस्ताराबाबत माहीती
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एवढंच नाही तर एकूण वीस आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील म्हटलं होतं.