पुणतांब्यात शेतकऱ्यांचा पेढे वाटून आनंद साजरा 

पुणतांब्यात शेतकऱ्यांचा पेढे वाटून आनंद साजरा 

शिर्डी - शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची घोषणा होताच शेतकरी संपाच्या राज्यव्यापी आंदोलनाचे सुरवातीचे केंद्र असलेल्या पुणतांब्यात कार्यकर्त्यांनी रविवारी पेढे वाटून व फटाके वाजवून आनंद साजरा केला. आंदोलनाची हाक देणारे नेते पुणतांब्याबाहेर असले, तरी त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. शेतकऱ्यांच्या आजवरच्या सर्वांत मोठ्या कर्जमाफीच्या निर्णयात पुणतांब्याचा सिंहाचा वाटा होता. याचा अभिमान व कौतुक येथील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. 

दरम्यान, जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी पेढे वाटून आणि फटाके फोडून जल्लोष केला. पुणतांबे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ शेतकऱ्यांनी फटाके वाजवून व गुलालाची उधळण करत जल्लोष केला. एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. रेल्वे स्थानक रस्त्यावर शेतकऱ्यांनी फटाक्‍यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत केले. 

शेतकऱ्यांच्या संपाची हाक पुणतांब्यातून दिली. ती देशभर पोचली. त्याचे श्रेय पुणतांबे परिसरातील शेतकऱ्यांना आहे. हा शेतकरी एकजुटीचा विजय आहे. 
- डॉ. धनंजय धनवटे 

आम्हीही संपावर जाऊ शकतो, हे शेतकऱ्यांनी सिद्ध केले. यापुढे राज्यकर्ते कोणीही असोत, त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सरकारच्या निर्णयाचे स्वागत करतो. 
- धनंजय धोर्डे 

आम्ही मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा केली. त्या वेळी सत्तर टक्के मागण्या मान्य झाल्या होत्या. झाले गेले बाजूला ठेवू. कर्जमाफीच्या घोषणेचे आम्ही मनापासून स्वागत करतो. हा ऐतिहासिक निर्णय आहे. 
- धनंजय जाधव 

पुणतांब्यातून हे आंदोलन उभे राहिले. राज्यभर पसरले. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देताना आता सरकारने नवे फाटे फोडू नयेत. शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. 
- सुहास वहाडणे, शिवसेना नेते 

संपूर्ण कर्जमुक्‍तीसाठी हा लढा होता. आजच्या निर्णयात सातबारा कोरा होण्याची शक्‍यता नाही. कर्जमाफीचा एकरी किती व किती एकरापर्यंत लाभ मिळेल, हे स्पष्ट नाही. त्यात ट्रॅक्‍टरसह शेती अवजारे व पॉलिहाउसच्या कर्जाचा उल्लेख नाही. कर्जाचे पुनर्गठण केलेल्यांना फायदा मिळणार नाही. शेतमालाच्या संदर्भात विशेष निर्णय न झाल्याने भाव पडण्याची भीती आहे. त्यातून शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी केलेली लढाई अर्धवट स्थितीत दिसते. त्यामुळे शेतकरी संघटना समाधानी नाही. लढा सुरूच ठेवणार आहोत. 
- अनिल घनवट, प्रदेशाध्यक्ष, शेतकरी संघटना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com