
Accident: बाळुमामा पालखी दर्शनाला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; वाहनांचा चक्काचूर
बाळुमामाच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात भाविक गंभीर जखमी झाले आहेत. करमाळा येथील भाविक धार्मिक कार्यक्रम उरकून घरी परतत असताना न्हावरे - तळेगाव ढमढेरे रस्त्यावरील दहिवडी घाट येथे पिकअप जीप आणि ट्रॅक्टर यांच्यात समोरासमोर जबर धडक झाली.(Shirur Accident balumama palkhi pickup carrying devotees)
या भीषण अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नेमकं काय घडलं?
करमाळा येथील भाविक बाळुमामाच्या पालखी तळावर जेवणाची पंगत आणि धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व भाविक परतीच्या मार्गावर पिकअप गाडीतून करमाळ्याच्या दिशेने निघाले होते.
न्हावरे - तळेगाव ढमढेरे रस्त्यावरील दहीवडी घाटात तळेगाव ढमढेरेच्या दिशेने येणारे तसेच भाविक बसलेले पिकअप आणि न्हावरेच्या दिशेकडून येणारा ट्रँक्टर यांच्यात समोरासमोर धडक झाली.
ट्रँक्टर चालक चुकीच्या दिशेने वाहन चालवत असल्याने हा अपघात झाला. या अपघातात पिकअप गाडी पलटी झाली असून ट्रँक्टरचे पाठीमागची चाके तुटून बाजुला पडली. तसेच या भीषण अपघातात दोन्ही वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघात झाल्यांनतर ट्रँक्टर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.