
शिव जयंतीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी फेसबुकवर खास पोस्ट शेअर केली आहे.
Shiv Jayanti 2023 : शिवरायांच्या 'या' कृतीमुळं हिंदू मनं पुन्हा ताठ उभी राहू लागली; राज ठाकरेंची खास पोस्ट
Shiv Jayanti Tithi 2023 : महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मतारखेवरून वाद सुरु आहे. मागच्या महिन्यात 19 फेब्रुवारीला उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.
परंतु, छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जन्मादिनाबद्दल दोन गटाचं दोन भिन्न मत असल्यामुळं शिवजयंती दोनदा साजरी केली जाते.
सरकारनं शिवजयंती दरवर्षी 19 फेब्रुवारीला साजरी केली जाईल. परंतु, फाल्गुन वद्य तृतीयेला देखील तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाईल, असं जाहीर केलं.
यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आज 10 मार्चला आहे. ही जयंती आज राज्यभरात साजरी केली जात आहे. या जयंतीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी फेसबुकवर खास पोस्ट शेअर केली आहे.
इस्लामी राजवटींच्या आक्रमणात हिंदू राजवटी धडाधड कोसळत होत्या
त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, 'आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. हिंदवी स्वराज्याची निर्मिती हे आपलं जीवितकार्य आहे व आपण ह्या ईश्वरी इच्छेचे वहनकर्ते आहोत ह्याची पुरेपूर जाणीव असणारे आपले महाराज.
त्याकाळी इस्लामी राजवटींच्या आक्रमणात हिंदू राजवटी धडाधड कोसळत होत्या. एखाद दुसरी घटना सोडली तर शतकानुशतकं अस्वस्थ हिंदू मनांना उभारी देईल अशी एकही घटना घडत नव्हती.'
देशाच्या कानाकोपऱ्यात शिवाजी महाराजांची जयगाथा घुमू लागली
बरं, इस्लामी राजवटी जिंकत होत्या, तो विजय हा काही त्या संस्कृती फार विकसित किंवा सुसज्ज होत्या म्हणून होत नव्हता. त्या आपल्या देशावर राज्य करू शकल्या, कारण आपण आत्ममग्न होतो, हिंदुधर्मीय म्हणून एकजूट नव्हतो.
पण, छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या कृतीमुळं ह्या खंडप्राय देशातील हिंदू मनं पुन्हा ताठ उभी राहू लागली. देशाच्या कानाकोपऱ्यात शिवाजी महाराजांची जयगाथा घुमू लागली आणि 'हिंदवी स्वराज्य' हे आवाक्यातील स्वप्न आहे हे हिंदू मनांना वाटू लागलं, असं राज ठाकरेंनी म्हटलंय.
आज महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आपण पुन्हा एकदा आत्ममग्न होत नाही आहोत ना? हिंदू एकजुटीचा निर्धार कमी पडत नाहीये ना, हे पाहणं हेच महाराजांच्या कार्यास यथोचित अभिवादन ठरेल.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा निर्धार हा हिंदू एकजुटीचा आहे आणि कायम राहील, असंही राज ठाकरेंनी शिवजयंतीनिमित्त नमूद केलंय.