शिवसैनिकांची आर्मी अन्‌ मीडिया सेल

संजय मिस्कीन
रविवार, 8 सप्टेंबर 2019

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटनाबांधणीवर जोर देतानाच माध्यमातील बदलत्या प्रवाहात शिवसैनिकांना सहभागी करण्यावर भर दिला. प्रचार आणि प्रसाराच्या बाबतीत सर्वांत अगोदर प्रभावी मीडिया सेल स्थापन करणारा शिवसेना हा राज्यातला पहिला पक्ष ठरलाय. 

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटनाबांधणीवर जोर देतानाच माध्यमातील बदलत्या प्रवाहात शिवसैनिकांना सहभागी करण्यावर भर दिला. प्रचार आणि प्रसाराच्या बाबतीत सर्वांत अगोदर प्रभावी मीडिया सेल स्थापन करणारा शिवसेना हा राज्यातला पहिला पक्ष ठरलाय. 

एका हातात झेंडा अन्‌ दुसऱ्या हातात धोंडा, असे शिवसैनिकांचे सुरवातीला वर्णन व्हायचं; पण २००४ पासून शिवसेनेने आक्रमक राजकारणाची कूस बदलत संयमी संघटना बांधणीवर लक्ष द्यायला सुरवात केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटनाबांधणीवर जोर देतानाच माध्यमातील बदलत्या प्रवाहात शिवसैनिकांना सहभागी करण्यावर भर दिला. प्रचार आणि प्रसाराच्या बाबतीत सर्वांत अगोदर प्रभावी मीडिया सेल स्थापन करणारा शिवसेना हा राज्यातला पहिला पक्ष ठरलाय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात पत्रकार परिषदा आणि माध्यमांतील प्रवक्ते पदाला फारसं महत्त्व नव्हतं; पण २००४ पासून उद्धव ठाकरे यांनी याकडे जाणिवपूर्वक लक्ष देत शिवसेनेचा मीडिया सेल उभारला. नव्या शिवसेना भवनमध्ये मीडिया सेल तयार केला. उत्तम लायब्ररी तयार केली. २००९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेचा मीडिया सेल सर्वांत आधुनिक होता, हे ऐकून तर नवलच वाटेल; पण जेव्हा व्हॉट्‌सॲप, फेसबुक आणि ट्‌विटरसारख्या सोशल मीडियाचं स्तोम नव्हते, तेव्हा ग्रुपच्या माध्यमातून शिवसेना शिवसैनिकांपर्यत आणि माध्यमांपर्यंत संदेश पोचवण्याचं काम जोरात करत होती. 

२००९ मध्ये शिवसेनेच्या मीडिया सेलनं खरी कात टाकली. जनसंपर्कप्रमुख हर्षल प्रधान यांनी जेव्हा या सेलची सूत्रे हाती घेतली, तेव्हा आधुनिकीकरण आणि इनहाउसवर त्यांनी भर दिला. शिवसैनिकांचाच वापर सोशल मीडियातली आर्मी म्हणून ते करू लागले. एखाद्या खासगी संस्थेला काम देण्यापेक्षा शिवसैनिकांमधूनच त्यांनी टीम उभी केली. २०१० मध्ये युवा सेनेची स्थापना झाल्यानंतर मात्र शिवसेनेच्या मीडिया सेलने जोरदार भरारी घेतली. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून नव्या अभिनव कल्पनांवर शिवसेनेचा जनसंपर्क सुरू झाला. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पना आणि हर्षल प्रधान यांची आखणी यामुळे शिवसेनेच्या कोणत्याही सभेचा, पत्रकार परिषदेचा आणि इतर घटनांचा जनमानसातला प्रभाव वाढू लागला. शिवसेना भवन या मध्यवर्ती कार्यालयातूनच शिवसैनिकांच्या माध्यमातून गावखेड्यांपर्यंत कोणताही संदेश क्षणार्धात पोचवण्याची ताकद शिवसेनेने सध्या निर्माण केली आहे. 

साचेबद्धपणा, एकसारखेपणा
पूर्वी शिवसेनेच्या प्रचार आणि प्रसार यंत्रणेत विस्कळितपणा असायचा. जो तो स्थानिक नेता आपापल्या परीने प्रचार, प्रसार करत असल्याने त्यामध्ये साचेबद्धपणा नव्हता. आता मात्र कोणतेही होर्डिंग्ज, सूचना फलक, सोशल मीडियात व्हायरल करावे लागणारे फोटो, व्हिडिओ आणि संदेश एकसारखे असतात. त्या सर्वांची डिझाईन, त्यावरील लोगो, वाक्‍य हे शिवसेना भवनातल्या मीडिया सेलमध्येच तयार होतात. त्यावर स्वत: उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे बारकाईने लक्ष असते. 

राज्यभरात एकाचवेळी एकाच प्रकारचे बॅनर झळकावणे, शाखा-शाखांवर एकाच पद्धतीचे फलक लावणे हे या मीडिया सेलमधूनच केले जाते. सध्या शिवसेनेच्या प्रत्येक शाखेवर ज्या प्रकारची समानता दिसते, ते याचेच श्रेय असल्याचे हर्षल प्रधान सांगतात. देशभरातील तब्बल ७५ हजार मीडियांत शिवसेना एकाचवेळी कोणताही संदेश पोचवू शकते. त्यासाठीची तंत्रकुशल यंत्रणा शिवसेना भवनमध्ये उभारण्यात आली आहे. 

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सभा, पत्रकार परिषदा या ७५ हजार मीडिया हाउसेसना एकाच वेळी लाइव्ह दिसेल, अशी प्रभावी यंत्रणा शिवसेनेने उभी केलेली आहे. शिवसेनेच्या सकारात्मक बाबी या यंत्रणेवरून प्रसारित केल्या जातात. सध्या राज्यभरामध्ये शिवसेनेच्या आंदोलनानंतर १० लाख शेतकऱ्यांना पीकविम्याचे ९६० कोटी रुपये मिळाल्याचे जी एकसमान होर्डिंग्ज दिसतात, ती याच पद्धतीचा परिपाक आहे. 

विरोधकांविरोधात ‘गनिमी कावा’ 
विरोधकांच्या चुका टिपून जनतेत विरोधकांबद्दलची नकारात्मकता वाढेल, यासाठीही मीडिया सेलमध्ये काम होते. यालाच ‘गनिमी कावा’ म्हटले जाते. जैतापूरचे आंदोलन पेटले, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अणुशास्रज्ञ अनिल काकोडकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. जैतापूर प्रकल्पाचा कोणताही धोका नाही, असा विश्‍वास लोकांमध्ये आणि माध्यमांत निर्माण व्हावा, यासाठी ते होते. पण यात पृथ्वीराज चव्हाण यांना डुलकी लागली. नेमकेपणानं हा क्षण कॅमेराबद्ध करून शिवसेनेने तो राज्यभरात पोचवला. महत्त्वाच्या संवेदनशील विषयावर चर्चा सुरू असताना, मुख्यमंत्री डुलक्‍या काढत होते, यावरून काँग्रेसची निंदा झाली. सोशल मीडियात डुलकी घेणारे चव्हाण यांचे छायाचित्र कमालीचे ट्रोल झाले. यासाठी शिवसेनेने कुठेही आपले नाव वापरले नाही, सौजन्य दिले नाही. जाहीर भाष्य केले नाही; पण प्रचारात मात्र त्या डुलकीचा जोरदार मुद्दा केला. अशाप्रकारे शिवसेनेचा मीडिया सेल गनिमीकाव्यानेदेखील काम करतो.

एकंदर शिवसेना आता केवळ मोर्चा आणि आंदोलनापुरतीच मर्यादित राहून लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत नाही; तर सोशल मीडियाचा प्रभावी वापर त्यासाठीची स्वतंत्र यंत्रणा, प्रत्येक विषयांचे संदर्भ साहित्य, तज्ज्ञ यांच्या योग्य वापरानं प्रचार व प्रसारात बाजी मारत आहे. पक्षाच्या विविध नेत्यांचा व्यक्तिमत्व विकासावर भर देत आहे. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचे राजकिय व्यक्तिमत्व प्रगल्भ आणि लोकाभिमुख राहील, यासाठी काम  करत आहे.

...संदर्भाची तत्काळ आदानप्रदान
उद्धव आणि आदित्य ठाकरे राज्यात कुठे दौरा करत असतील अन्‌ त्यांना अचानक एखाद्या विषयाची सविस्तर व अधिकृत माहिती हवी असेल तर शिवसेना भवनमधून ती तातडीने पोचवली जाते. यासाठी अनेक विषयांतील संदर्भ साहित्य शिवसेना भवनमध्ये उपलब्ध आहे. कोणत्याही विषयातले जुने संदर्भ, आकडेवारी तत्काळ उपलब्ध करून देणारी स्वतंत्र टीम आहे. सध्या लोकसभेसाठी नामांकित माध्यम सल्लागार प्रशांत किशोर यांच्याकडे शिवसेनेने जबाबदारी दिली; पण त्यापेक्षा उत्तम काम शिवसेनेचे स्वत: उभारलेला मीडिया सेल करत असल्याचे नाकारता येत नाही. प्रशांत किशोर यांच्याकडे ‘आदित्य संवाद’ कार्यक्रमाची मोठी जबाबदारी दिली; पण कार्यक्रमाची आखणी व रचना यापुरतीच ती मर्यादित राहिली. कन्टेन्ट प्लान म्हणून शिवसेनेच्या मीडिया सेलनेच सगळी जबाबदारी पार पाडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena and Media Cell