
Shivsena: शितल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओवर शिवसेनेची प्रतिक्रिया; म्हटलं ही तर...
शिवसेनेच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक मॉर्फ व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. शितल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत सामील झाले होते.
या रॅलीतील शितल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा व्हिडीओ मॉर्फ करून त्यावर अश्लील मजकूर करून व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेतून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पक्षाची अधिकृत भूमिका मांडली आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या व्हिडीओ मागे उद्धव ठाकरे गटाचा हात असल्याचा आरोप केला आहे.
ते म्हणाले, गर्दीच्या ठिकाणी आपण असल्यावर एकमेकांचा आवाज ऐकू येत नाही. त्यामुळे आपण जवळ जाऊन बोलतो त्यामागे कोणाचाही वाईट हेतू नसतो, एखाद्या महिलेची बदनामी करने हे योग्य नाही.
लढाई ही विचारांची-तत्वांची असली पाहिजे, या घटनेचा प्रत्येक स्त्रीने निषेध केला पाहिजे. तर ठाकरे गटावर बोलताना म्हणाले की काल रात्री मातोश्रीवर बसून ठाकरे गटाचे काही नेते त्यांच्या पक्षातील पदाधिकारी नेते, माजी आमदार, खासदारांना व्हिडीओ पाठवून व्हायरल करायला सांगत होते.
मातोश्रीवर बसून आदेश देत होते. असे धक्कादायक आरोप नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे गटावर केले आहेत. त्यामुळे आता ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.