शिवसेनेच्या राजीनामा अस्त्रानंतर पुढे काय? 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार का, की बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देणार का, हे प्रश्‍न सध्या गुलदस्तात आहेत. मतदानाला अद्याप अवधी आहे. यापुढील काळात प्रचार शिगेला पोचताना शिवसेना कोणते डावपेच लढवणार? कशा स्वरूपाची राजकीय रणनीती अवलंबणार याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे.

मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणूक जागावाटपाची चर्चा फिसकटली आणि भाजप-शिवसेना युती तुटली. त्यानंतर प्रचारादरम्यान राज्य सरकारमधून बाहेर पडण्यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांनी "राजीनामा अस्त्र' सोडत सरकार "नोटीस पिरिएड'वर ठेवले. यानंतर शिवसेना कोणती रणनीती अवलंबणार, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. 

केंद्रात आणि राज्यात शिवसेना भाजपसोबत सत्तेत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीची जागावाटपाची चर्चा थांबली आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाची घोषणा केली. "यापुढे भाजपबरोबर युती नाही. मी कोणापुढे कटोरा घेऊन जाणार नाही,' असे विधान करीत महापालिका प्रचाराचे रणशिंग फुंकले. या प्रचारादरम्यान उद्धव यांच्यासह शिवसेनेच्या मंत्र्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याची भाषा केली. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी, तर राजीनामा पत्र माध्यमापुढे जाऊन फडकावून दाखवले. 

शिवसेनेच्या या आक्रमक भुमिकेमुळे सरकार डळमळीत झाल्याची चर्चा सुरू झाली. शिवसेना केव्हा बाहेर पडणार याच्या तारखा जाहीर करण्यापर्यंत वातावरण तापले. शिवसेनेच्या या "राजीनामा अस्त्रा'ने भाजप बॅकफुटवर गेल्याचे चित्र निर्माण झाले. आपले सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल. आमचा बी प्लॅन तयार आहे, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे.

शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार का, की बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देणार का, हे प्रश्‍न सध्या गुलदस्तात आहेत. मतदानाला अद्याप अवधी आहे. यापुढील काळात प्रचार शिगेला पोचताना शिवसेना कोणते डावपेच लढवणार? कशा स्वरूपाची राजकीय रणनीती अवलंबणार याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे.

Web Title: shiv sena, bjp alliance issue