शिवसेना, भाजपमध्ये बंडाचा झेंडा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

पुणे - निष्ठावंतांना डावलून अखेरच्या क्षणी पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिल्यामुळे मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यासह नागपुरात राजकीय पक्षांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. घोषणाबाजी, आरोप-प्रत्यारोप आणि "राडा' करत संतप्त कार्यकर्त्यांनी असंतोषाला वाट करून दिली. सत्ताधारी भाजप, शिवसेनेला याचा सर्वाधिक फटका बसला.

पुणे - निष्ठावंतांना डावलून अखेरच्या क्षणी पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिल्यामुळे मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यासह नागपुरात राजकीय पक्षांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. घोषणाबाजी, आरोप-प्रत्यारोप आणि "राडा' करत संतप्त कार्यकर्त्यांनी असंतोषाला वाट करून दिली. सत्ताधारी भाजप, शिवसेनेला याचा सर्वाधिक फटका बसला.

भगव्या झेंड्याखाली बंडाचे निशाण
मुंबई : शिवसैनिकांच्या मनातील भावना ओळखून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युती तोडण्याचा धाडसी निर्णय घेतला असला तरी, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत शिवसेनेकडून अधिकृत तिकीट न दिल्याने, शिवबंधनाचा धागा तोडून भगवा झेंडा खांद्यावरून दूर करत शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी बंडाचे निशाण हाती घेतले. बंडोबांना थंड केले नाही तर शिवसेनेच्या विद्यमान महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह अनेक उमेदवारांना बंडखोरांचा फटका बसण्याची शक्‍यता आहे.

शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका, विद्यमान महापौर श्रद्धा जाधव यांच्या उमेदवारीला स्थानिक नगरसेवक नंदकुमार विचारे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला होता. तरीही पक्ष नेतृत्वाने जाधव यांना एबी फॉर्म दिल्याचे समजताच, शाखेतील तीन महिला पदाधिकाऱ्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर मुंबईतही मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे.

दरम्यान, शिवसेनेचे नाना आंबोले आणि बबलू पांचाळ यांच्या पाठोपाठ मुलुंडमध्ये प्रभाकर शिंदे यांनीही तिकीट न मिळाल्याने भाजपच्या तंबूत जाण्याचा निर्णय घेतला. ज्या शिवसैनिकांनी नाराजीपोटी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, त्यांची समजूत काढण्यात येईल, शिवबंधनाची आठवण केली जाईल, असे शिवसेना विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांनी सांगितले.

अकोल्यात भाजपकडून महापौरांनाच डच्चू
अकोला ः अकोला जिल्ह्याच्या राजकारणात एकहाती सत्ता ठेवण्यासाठी भाजपचे खासदार संजय धोत्रे आणि गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यात सुरू असलेल्या वर्चस्वाच्या लढाईत अखेर धोत्रे गट वरचढ ठरला. पाटील गटाच्या विद्यमान महापौर उज्ज्वला देशमुख यांना उमेदवार यादीत डच्चू देत धोत्रे गटाने पाटील गटाला धोबीपछाड दिला आहे.

नाशिकमध्ये शिवसेनेत "दंगल'; सौम्य लाठीचार्ज
नाशिक ः निष्ठावंतांना डावलून आयात केलेल्या उमेदवारांना पक्षाची अधिकृत उमेदवारी दिल्याच्या कारणावरून आज शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये बंद खोलीत "दंगल' झाली. कपडे फाडाफाडी, शिवीगाळ झाल्याचे वृत्त बंद खोलीतून बाहेर येताच संतप्त शिवसैनिकांमधील विरोधकांनी परस्परांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केल्याने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

गडकरी वाड्यापुढे तुफान घोषणाबाजी
नागपूर ः उमेदवारीच्या अपेक्षेने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाड्याकडे नजर लावून बसलेल्या अनेक इच्छुकांचा असंतोष उमेदवारी न मिळाल्याने आज उफाळून आला. गडकरी वाड्यापुढे घोषणाबाजी करणाऱ्यांमध्ये भाजपसह बजरंग दल, विश्‍व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचाही समावेश होता; तर जुन्याच कार्यकर्त्यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या काही जणांनी भाजपचे काम न करण्याचा निर्णय जाहीर केला. उमेदवारी नाकारलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी बंडखोरी करून शिवसेनेची वाट धरली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही उमेदवारीवरून कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला.

Web Title: Shiv Sena, BJP rebellion