सेनेची भाजपविरोधात डरकाळी; 2019 मध्ये स्वतंत्र लढणार...

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 जानेवारी 2018

लोकभेच्या महाराष्ट्रातील 48 पैकी 25 जागा; आणि विधानसभेच्या 288 पैकी 150 जागा जिंकण्याचा निर्धारही शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आला. उद्धव यांचे तरुण पुत्र व युवा सेनेचे नेते आदित्य यांनाही राजकीय बढती देत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आल्याची घोषणा यावेळी करण्यात आली

मुंबई - 2019 मधील लोकसभा निवडणूक व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर (भाजप) युती न करण्याची घोषणा शिवसेनेकडून आज (मंगळवार) करण्यात आली. सेनेचे खासदार संजय राउत यांनी मुंबईमध्ये शिवसेनेच्या अधिवेशनात यासंदर्भातील ठराव मांडला आणि तो एकमताने संमत करण्यात आला. 

याबरोबरच लोकभेच्या महाराष्ट्रातील 48 पैकी 25 जागा; आणि विधानसभेच्या 288 पैकी 150 जागा जिंकण्याचा निर्धारही शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आला. उद्धव यांचे तरुण पुत्र व युवा सेनेचे नेते आदित्य यांनाही राजकीय बढती देत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. 

सध्याचे राज्यातील मंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत खैरे, अनंत गीते आणि आनंदराव अडसूळ या खासदारांना सेना नेते म्हणून मान्यता देण्यात आली. यावेळी  संमत करण्यात आलेल्या इतर ठरावांत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी करण्यात आली.

मागील वर्षी झालेली मुंबई महानगरपालिका निवडणुकही शिवसेनेने स्वबळावरच लढवली होती. यावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर शेलक्या शब्दांत टीका केली होती. त्यानंतर दोन्ही पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपच्या विरोधात रान उठवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Web Title: shiv sena bjp uddhav thackeray mumbai