मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवर शिवसेनेचा बहिष्कार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 जानेवारी 2017

मुंबई - शिवसेना-भाजपची मुंबईतील 25 वर्षांची युती तुटल्यानंतर काही काळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरील खासदारांच्या नियोजित बैठकीवर शिवसेना खासदारांनी बहिष्कार टाकल्याने तुटलेल्या युतीतली धुसफुस वाढणार असल्याचे स्पष्ट झाले. युती तुटल्याची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच शिवसेना आणि भाजपचे खासदार आमनेसामने आले, मात्र शिवसेनेचे खासदार निवेदन देऊन बाहेर पडल्याने वातावरण फार ताणले गेले नाही.

केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज राज्यातील सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे. संसदेच्या प्रत्येक अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री राज्यातील खासदारांबरोबर बैठक घेऊन राज्याच्या समस्या केंद्राकडे कशा आक्रमक पद्धतीने मांडता येतील यावर चर्चा करतात. यंदाचे बजेट 1 फेब्रुवारीला सादर होणार असून, त्यात महाराष्ट्राला काय मिळणार, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. परंतु युती तुटल्याच्या घोषणेनंतर, शिवसेना खासदार अधिवेशनात काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.

खासदारांच्या बैठकीवेळी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले. याविषयी सावंत यांनी सांगितले, की राज्याच्या प्रश्‍नांविषयी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना यापूर्वीच निवेदन दिलेले आहे. अर्थसंकल्प सादर होण्याच्या चार दिवस अगोदर बैठक घेऊन काय उपयोग आहे. शिवसेनेने राज्याचे प्रश्‍न यापूर्वीच अर्थमंत्र्यांसमोर निवेदन देऊन ठेवलेले आहेत, त्याचा पाठपुरावाही केलेला आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली ही बैठक निष्फळ असल्याचे मत नोंदविले.

Web Title: Shiv Sena boycott on the Chief Minister's meeting