बरं झालं, युती तुटली!

प्रकाश पाटील
शुक्रवार, 27 जानेवारी 2017

बाळासाहेब ठाकरे एकदा म्हणाले होते, उद्या ते (म्हणजे कोण ते ओळखा) मुंबई गिळतील, राज्य गिळतील आणी देशही गिळतील... तर मराठी माणसा सावधान. मुंबईला गिळु देऊ नका ही तुम्हाला 105 हुतात्म्यांच्या रक्ताची शपथ...

माझा अतिशय जवळचा एक मित्र आहे. खरं तर तो संघाचा स्वयंसेवक, भाजपचा कार्यकर्ता व त्यापेक्षा मोठा मोदीभक्त. त्यामुळे बोलण्यात नेहमीच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याविषयी किती प्रेम असेल हे सांगायची गरज नाही. सात-आठ महिन्यांपूर्वी त्याला सरकारी नोकरी लागली आणि तो मुंबईत गेला. 

मित्राचा कालच (गुरुवारी) मोबाइल आला होता. तो म्हणाला, "काय होणार युतीचे?" मी म्हणालो,"नाही बुवा सांगता येत पण युती होण्याची शक्यता दिसत नाही अन झाली तर चांगलच आहे." तो म्हणाला,"युती होवो अगर न होवो मुंबईत शिवसेना हवी. मुंबईत शिवसेना नसेल तर मराठी माणसाचं काही खरं नाही." त्याचं हे परखड मत ऐकुन मला धक्काच बसला. वास्तविक तो संघाचा-भाजपचा कडवा समर्थक. त्याने तर शिवसेनेला विरोध करायला हवा होता; पण नाही त्याला शिवसेना महत्त्वाची वाटते.

शिवसेनेमुळे सुरक्षितता वाटते हे त्याच्या बोलण्यातुन मला जाणवत होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून जो मराठी माणुस मुंबईला जातो त्याची सर्वसाधारणपणे हीच भावना असते मग तो आपल्या गावाकडे कुठल्याही पक्षाचा असो. मुंबईत गेल्याशिवाय शिवसेनेचं महत्त्व कळत नाही हे कटु सत्य आहे. 

महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा कोटींवर आहे. त्यापैकी दोनेक कोटी परप्रांतीय सोडले तर उर्वरीत मराठी माणसांचा आत्मा म्हणजे मुंबई आहे. मराठी माणसाची मुंबई कोणत्याही परिस्थितीत परप्रांतियांच्या घशात जाऊ द्यायची नाही, अशी शपथ प्रत्येक मराठी माणसाने घ्यायला हवी. जवाहरलाल नेहरु, मोरारजी देसाई ते संजय निरुपम व भाजपची काही मंडळी मुंबईचा लचका तोडण्यास टपून बसले आहेत; पण जोपर्यंत मराठी माणुस जिवंत आहे तोपर्यंत मुंबईला कोणीही महाराष्ट्रापासुन वेगळे करु शकत नाही.

महाराष्ट्राला आतापर्यंत जे मुख्यमंत्री लाभले त्यांनी मुंबईतील मराठीपणा जपण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही मनात शिवसेनेशी युती करण्याची इच्छा असली तरी त्यांना भाजपातील झुरळे विरोध करत आहेत व त्यामुळेच युती होऊ शकली नाही. शिवसेनेला धुळ चारण्याविषयीचा आत्मविश्वास काही नेत्यांच्या अंगलट येऊ शकतो हे त्यांना कोण सांगणार? इंदिरा लाटेप्रमाणे देशात मोदी लाट आली. या लाटेचा फटका शिवसेनेलाही बसला. लाट कायम राहत नाही तर ती ओसरतेच. या लाटेचा प्रत्येक वेळी परिणाम होईल असे नाही अन् ते शिवसेनेलाही कळुन चुकले आहे.

मुंबईत भाजप स्वबळावर बहुमताचा आकडाही गाठु शकणार नाही याची खात्री पटल्यानेच उद्धव ठाकरेंनी युती तोडली. भाजप ने एक-दोन नव्हे तर गेली पंचविस वर्षे शिवसेनेचा अनुभव घेतला आहे. शिवसेनेने स्वपक्षातील बलाढ्य बंडखोर नेत्यांना उदा. छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे आदींना यांना लोळवले आहे. विरोधकांनाही पळता भुई थोडी केली आहे याचे भाजपला विस्मरण झालेले दिसते. शिवसेना कोणत्याही क्षणी उसळी घेऊ शकते याचा विचार भाजप नेत्यांनी करायला हवा होता. 

इतके मान-अपमान झाल्यानंतर शेवटी उद्धव यांनी युती तोडली हे बरे झाले. गेल्या विधानसभेत जे भाजपने केले ते शिवसेनेने करुन दाखवले. या सर्व घडामोडीत शिवसेनेने बाजी मारली, असे म्हणता येईल. महापालिका निवडणुकीत मुंबई कळीचा मुद्दा असणार आहे याचा परिणाम राज्यात नक्की दिसेल. भाजपचा घोडा ज्याप्रमाणे उधळत निघाला होता, त्याला शिवसेनेने लगाम घातला, असे म्हणावे लागेल.

दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मुंबई बरोबरच शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप संबंधांवर तुटुन पडेल, असे दिसते. भाजपचे राष्ट्रवादी काँग्रेसच्याजवळ जाणे भाजप कार्यकर्त्यांनाही पसंत नाही. भाजप नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस जवळची वाटत असली तरी कार्यकर्त्यांना तसे वाटत नाही.

महापालिकेत युती तुटल्याने शिवसेना उद्या केंद्रात व राज्यातील सत्तेतुनही बाहेर पडु शकते. केंद्रात काही फरक पडणार नसला तरी राज्यातील सरकार अल्पमतात आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा बाहेरुन पाठींबा घेउन सरकार चालवावे लागले तर भाजपच्या जनमानसातील प्रतिमेला धक्का बसेल व त्याचा परिणाम भविष्यात होऊ शकतो. शेवटी भाजप-शिवसेना नैसर्गिक युती होती. लोकांना ती अखंड रहावी, असं वाटत होते पण लोकांना जे वाटते ते भाजपला वाटत नाही. राज्यात सर्वत्र कमळ फुलेल हा फाजील आत्मविश्वास भाजपला नडल्याशिवाय राहणार नाही असेच म्हणावे लागेल.

गेल्या पंचविस वर्षांत मुंबई महापालिकेत अखंड राहिलेली युती तोडण्याचे धाडस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही दाखवता आले नाही ते धाडस उद्धव ठाकरेंनी दाखवले याबद्दल त्यांचे कौतुकच करावे लागेल. आता घोडा मैदान जवळच आहे. बलाढ्य आणी उन्मत्त हत्तीशी शिवसेना कशी सामना करते पहावे लागेल. युती तुटली नसती तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांची धुळधाण उडाली असती. युती झाली नाही हे दोनही काँग्रेसचे नशीबच म्हणावे लागेल.

मुंबई हा महाराष्ट्राचा आत्मा आहे. मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या प्रत्येकाला मुंबईत शिवसेना हवी असे का वाटते, याचा विचार भाजप ने करायला हवा.
बाळासाहेब ठाकरे एकदा म्हणाले होते, उद्या ते (म्हणजे कोण ते ओळखा) मुंबई गिळतील, राज्य गिळतील आणी देशही गिळतील... तर मराठी माणसा सावधान. मुंबईला गिळु देऊ नका ही तुम्हाला 105 हुतात्म्यांच्या रक्ताची शपथ...

Web Title: Shiv Sena breaks alliance with BJP