भाजपविरोधात उद्धव ठाकरे, हार्दिक पटेल एकत्र

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

गुजरातेत भाजपला आव्हान देणाऱ्या हार्दिक पटेल यांची आज (मंगळवार) मुंबईत पाटीदार समाजासमवेत सभा आहे. या सभेला उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित राहणार आहेत.

मुंबई - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवारी (ता. 7) होणाऱ्या सभेला गुजरातचे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल उपस्थित रहाणार आहेत.

गुजरातेत भाजपला आव्हान देणाऱ्या हार्दिक पटेल यांची आज (मंगळवार) मुंबईत पाटीदार समाजासमवेत सभा आहे. या सभेला उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित राहणार आहेत, तसेच गोरेगावात होणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला पटेल यांनीही उपस्थित राहावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सायंकाळी 5.30 वाजता होणाऱ्या सभेला ते संबोधित करणार आहेत, असे सांगितले जात होते.

भाजप-शिवसेना पक्षांनी परस्परांविरोधात प्रचारात आक्रमक पातळी गाठली असतानाच शिवसेना महापालिका मतदानापूर्वी पाठिंबा काढून टाकेल, अशा चर्चांना ऊत आला आहे. शिवसेनेचे नाव न घेता कोणत्याही सहकाऱ्याने पाठिंबा काढला, तरी सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्‍त केला आहे. मात्र दोन्ही पक्षांच्या परस्परविरोधाची पातळी कमालीची घसरली आहे.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप सरकारला दिलेल्या पाठिंब्याचा फेरविचार करू, असे विधान केले आहे. यानंतर सोशल मीडियावर शिवसेना मतदानाआधी पाठिंबा काढणार असल्याची अफवा पसरली.

Web Title: Shiv Sena chief Uddhav Thackeray to meet Hardik Patel