औरंगाबादमध्ये परवानगी नसतानाही शिवसेनेचा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

"शिवसेनाप्रमुखांच्या शिकवणीप्रमाणे हिंदूंचे रक्षण करणे शिवसेनेचे कर्तव्य आहे. आम्ही तेच बजावले. आमच्या घरांवर दगड फेकले; तर गप्प बसणार नाही. शिवसेनेने केलेली मदत लक्षात ठेवा''.

औरंगाबाद : दंगेखोरांना अटक व हिंदूंना सुरक्षेची हमी द्यावी, या मागणीसाठी शिवसनेने पोलिस परवानगी नसतानाही शनिवारी (ता. 19) शहरातून शांततेत हिंदूशक्ती मोर्चा काढला. या मोर्चासाठी पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता. 

शहरातील काही भागांत 11 व 12 मे रोजी दंगल झाली. यामध्ये दोघांचा बळी गेला, तर वाहने, दुकाने आणि घरांची जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने शनिवारी हिंदूशक्ती मोर्चा काढला. पैठणगेट परिसरातून दुपारी बारा वाजता मोर्चाला सुरवात होऊन सरस्वती भुवन शाळेच्या मैदानावर समारोप झाला.

या वेळी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, ""शिवसेनाप्रमुखांच्या शिकवणीप्रमाणे हिंदूंचे रक्षण करणे शिवसेनेचे कर्तव्य आहे. आम्ही तेच बजावले. आमच्या घरांवर दगड फेकले; तर गप्प बसणार नाही. शिवसेनेने केलेली मदत लक्षात ठेवा'', असे आवाहन त्यांनी केले. 

पैठणगेटला छावणीचे स्वरूप 

अनुचित प्रकार टाळण्यासाठी पैठणगेट परिसरात पोलिस आयुक्त, तीन उपायुक्त, पोलिस अधिकाऱ्यांसह, एसआरपीएफ, वज्र, वरुण, दंगाकाबू पथक, क्‍यूआरटी कमांडोचा तगडा बंदोबस्त होता. त्यामुळे या परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. दरम्यान, या भागात सकाळी दहाच्या सुमारास तासभर मोबाईल इंटरनेट सेवा बंद होती. 
 

Web Title: Shiv Sena even though there was no permission in Aurangabad for Agitation