जागा वाटपासाठीच शिवसेनेची आक्रमकता? भाजप नमणार?

सोमवार, 24 डिसेंबर 2018

पंढरपूर : पीकविमा योजनेपासून राफेल विमान खरेदीतील कथित गैरव्यवहारांपर्यंत सर्वच मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका करत केंद्र आणि राज्यातील सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभेसाठीची 'बार्गेनिंग पॉवर' वाढल्याचेच आजच्या सभेतून दाखवून दिले. 

पंढरपूर : पीकविमा योजनेपासून राफेल विमान खरेदीतील कथित गैरव्यवहारांपर्यंत सर्वच मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका करत केंद्र आणि राज्यातील सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभेसाठीची 'बार्गेनिंग पॉवर' वाढल्याचेच आजच्या सभेतून दाखवून दिले. 

पंढरपूरमध्ये घेतलेल्या आजच्या शिवसेनेच्या सभेस प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीसमोर केलेल्या भाषणामध्ये ठाकरे यांनी राफेल विमान खरेदीसंदर्भातील कॉंग्रेसच्या सुरात सूर मिळवला आहे. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारांमध्ये कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेलवरून पंतप्रधान मोदी यांच्यावर जे आरोप केले, तेच आणि तशाच पद्धतीने ठाकरे यांनीही आज मोदींवर टीकास्त्र सोडले. 

मुख्यमंत्री फडणवीस आणि ठाकरे यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्याचे वृत्त पसरत असले, तरीही ठाकरे यांनी जाहीर सभांमध्ये मात्र भाजपवर टीका करण्याची भूमिका कायम ठेवली आहे. 

'सरकार बदलल्यानंतर शेतकरी, महिलांच्या जीवनात काय बदल झाला', असा प्रश्‍न विचारत ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले. तसेच, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे आणि पीकविम्यावरूनही पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. 

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना सर्वच राजकीय पक्ष आता जागावाटपाच्या तयारीस लागले आहेत. बिहारमध्ये नितीशकुमार, रामविलास पासवान आणि भाजपमध्ये जागावाटप नक्की झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच झळकले होते. त्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रामध्ये मात्र शिवसेना आणि भाजपमध्ये अजून युतीविषयी संदिग्धता आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि ठाकरे यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्याचे वृत्त पसरत असले, तरीही ठाकरे यांनी जाहीर सभांमध्ये मात्र भाजपवर टीका करण्याची भूमिका कायम ठेवली आहे. 

त्यामुळे ठाकरे आक्रमक असले, तरीही प्रत्यक्षात सरकारमधून बाहेर पडत नसल्याने जाहीर सभांमधील आक्रमकता दाखवून जागा वाटपातील 'बार्गेनिंग पॉवर' वाढल्याचे शिवसेना दाखवून देत आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांमध्ये भाजपचा धाकटा भाऊ असलेल्या शिवसेनेने राम मंदिराच्या मुद्यावरून हिंदुत्ववादाची कास धरून भाजपला अडचणीत आणण्याचे धोरण अवलंबिले असल्याचेही स्पष्ट होऊ लागले आहे. 

  • या आक्रमक भूमिकेतून जागा वाटपामध्ये शिवसेनेच्या पदरात काही पडेल, असे वाटते का? 
  • राम मंदिराच्या भूमिकेवरून शिवसेना भाजपला खिंडीत गाठू शकेल का? 
  • लोकसभा आणि विधानसभेसाठी भाजप-शिवसेना युती होईल का? 

मांडा तुमचे मत! 
खाली प्रतिक्रियांमध्ये व्यक्त व्हा किंवा ई-मेल करा webeditor@esakal.com या आयडीवर! 

Web Title: Shiv Sena gets the bargaining power for seat sharing as BJP is on backfoot after defeat in MP, Chhatigarh and Rajasthan