शिवसेनेच्या  नेत्यांना घरी बसावे लागणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

लोकसभेच्या तुलनेने विधानसभेला बुथ आणि प्रभागस्तरावर मताधिक्य घटले असल्यास शिवसेनेच्या गल्लीतल्या नेत्यांना घरी बसावे लागणार आहे. राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर शिवसेनेत खांदेपालट होण्याची  शक्‍यता आहे.

मुंबई - लोकसभेच्या तुलनेने विधानसभेला बुथ आणि प्रभागस्तरावर मताधिक्य घटले असल्यास शिवसेनेच्या गल्लीतल्या नेत्यांना घरी बसावे लागणार आहे. राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर शिवसेनेत खांदेपालट होण्याची  शक्‍यता आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपने मुंबईत खणखणीत विजय मिळवला होता. त्यानुसार अणुशक्तीनगर अाणि वांद्रे पूर्वची जागा शिवसेनेला सहज जिंकता येणारी होती; मात्र विधानसभेत दोन्ही जागा गमावाव्या लागल्या. त्यात वांद्रे पूर्वेला अंतर्गत बंडखोरीचा फटका बसला असला, तरी अणुशक्तीनगरमध्ये नाराजी नव्हती. असे असतानाही अणुशक्तीनगरची जागा गमवावी लागली. लोकसभेला शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांना ११ हजारांचे मताधिक्य होते. तरीही विधानसभेला तुकाराम काते यांचा पराभव झाला. अनेक विधानसभांमधील बुथ आणि प्रभागात अपेक्षित मताधिक्य मिळालेले नाही.

शिवसेनेच्या आमदारांची संख्या कमी झालेली नसली, तरी आगामी महापालिका निवडणुकांचा विचार करता घटलेल्या मताधिक्याची किंमत चुकवावी लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सर्वच भागातील मताधिक्य घटलेल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर संक्रांत येण्याची शक्‍यता आहे. दिवाळीनंतर व राज्यातील सत्तास्थापना झाल्यानंतर अवकाशाने सर्वांचा हिशेब लावून आवश्‍यक बदल स्थानिक पातळीवर केले जातील, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे.

टीम आदित्यला स्थान 
विधानसभेत पोहोचल्यावर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची भूमिका शहरांमधील शिवसेनेसाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे खांदेबदलात तरुणांना जास्तीत जास्त प्राधान्य दिले जाण्याची शक्‍यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेताच पक्षात असेच बदल करण्यास सुरुवात केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena leaders may be changes