शिवसेना कर्जमाफीबाबत आग्रही? किशोर तिवारींचे मार्गदर्शन

टीम ई-सकाळ
बुधवार, 26 जून 2019

- शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीसाठी मोहीम

मुंबई : शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या विषयाला वाचा फोडणाऱ्या किशोर तिवारी यांनी शिवसेनेचे मंत्री, आमदारांसोबत बंद दाराआड आज (बुधवार) चर्चा केली. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळाला नसल्याची माहिती तिवारी यांनी यावेळी दिली.

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सेनेच्या सर्व आमदार, मंत्र्यांसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. तिवारी म्हणाले, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. शेतकरी अजूनही हालाखीत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शिवसेना आग्रही असून, शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे सांगण्यात आले. 

शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीसाठी मोहीम

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी शिवसेनेने मदत मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी राज्यातील सर्व शिवसेनेचे मंत्री, आमदार, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुखांची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये संपन्न झाली. या बैठकीत मार्गदर्शन करतांना उद्धव ठाकरे यांनी मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं.

नुसत्या घोषणा म्हणजे वचनपूर्ती नाही

नुसत्या घोषणा म्हणजे वचनपूर्ती नाही. घोषणांची अंमलबजावणी होते की नाही हे बघणं आपलं काम आहे. शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन नुसते चहा पिवू नका तर जनतेला अन्यायमुक्त करा, हीच शिवसेनेची ओळख आहे.

शिवसेनेचा वाघ कामातून दाखवा

कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला ही आपली घोषणा आहे. मात्र, शिवसेनेचा वाघ काय असतो हे आपल्या कामातून दाखवून द्या असंही उद्धव यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena on loan waiver issue Guidelines by Kishor Tiwari