
Uddhav Thackeray : "कदम कुटुंब राजकारणात जिवंत राहू नये म्हणून..." ; उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
उद्या खेड येथील गोळीबार मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. यापूर्वी शिवसेनेचे खेड-दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
योगेश कदम म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी मला राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न केला. रामदास कदम, मला आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी खेड येथे सभा घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी मला फक्त संपविण्याचा फक्त प्रयत्न केला नाही तर अनिल परब यांना माझ्या मतदारसंघात सोडलं होतं. परब रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असताना देखील ते कधी खेडमध्ये आले नव्हते. पण मला संपवण्यासाठी ते ४ ते ५ दिवस ठाण मांडून बसले होते."
अनिल परब आणि सुभाष देसाई यांनी रामदास कदम यांच्या बाबत उद्धव ठाकरेंजवळ गैरसमज पसरवले होते. या दोघांशिवाय मातोश्रीवर कोणाचं ऐकलं जात नव्हते, असा आरोप योगेश कदम यांनी केला.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील सभेत शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यांनी एकनाथ शिंदे, रामदास कदम यांच्यावर तुफान फटकेबाजी केली होती. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील उद्या मैदानात उतरणार आहे.