मनसेचे लक्ष आता शिवसेनेच्या टाळीकडे

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 जानेवारी 2017

मुंबई - शिवसेना-भाजप युतीच्या काडीमोडानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शिवसेनेच्या टाळीची आस लागली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि मुंबई महापालिकेतील गटनेते संदीप देशपांडे यांच्या सूचक उद्‌गारांमुळे मनसेच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मुंबई - शिवसेना-भाजप युतीच्या काडीमोडानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शिवसेनेच्या टाळीची आस लागली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि मुंबई महापालिकेतील गटनेते संदीप देशपांडे यांच्या सूचक उद्‌गारांमुळे मनसेच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजप युती तुटल्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली होती. या संदर्भातील निर्णय घेण्यासाठी दोन्ही बाजूंच्या दोन नेत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली होती. यासाठी राज यांनी सकारात्मक पुढाकार घेतला होता. मात्र पुढे शिवसेनेकडून प्रतिसाद न मिळाल्याने नवी समीकरणे उदयास आली नव्हती.

मुंबईसह दहा महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या तोंडावर युतीचा काडीमोड झाला. यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दोन भावांनी एकत्र येण्यासाठी आपली राजकीय कारकीर्द पणाला लावण्याचे वक्‍तव्य केले. मुंबई महापालिकेतील मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनीही "शत्रूचा शत्रू तो आपला मित्र' असे सूचक विधान केले आहे. यामुळे शिवसेना-मनसेमध्ये काही प्रमाणात तरी मनोमिलन होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेना व मनसेत समझोता झाला नाही, तरी एकमेकांच्या उमेदवाराला मदत करण्याच्या हालचाली सुरू असल्याचेही समजते.

एकीत दादरचा गडाचा अडसर
भाजपबरोबरचा संसार मोडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षमिलनाच्या चर्चेने जोर धरला असला, तरी दादरचा गड हा त्यांच्या एकत्र येण्याच्या मार्गातला दगड ठरू शकतो. मुंबईत शिवसेना आणि मनसेचा मतदार एकच आहे. शिवाय दादर हा दोन्ही पक्षांचा श्‍वास आहे. दादर या गडावर मनसेचा झेंडा आहे. हा गड मनसेने शिवसेनेकडून काबीज केला आहे. ही सल शिवसनेच्या मनात असल्याने मनसे-शिवसेनेच्या एकत्र येण्यातील तोच मोठा अडसर असल्याचे सांगण्यात येते. दादर परिसरातील सर्व नगरसेवक मनसेचे आहेत; तर आमदार शिवसेनेचा आहे. त्यानुळे दादरमध्ये माघार कोण घेणार, असा प्रश्‍न आहे.

Web Title: Shiv Sena, MNS to focus together