शिवसेनेचेही 'चलो अयोध्या'..!

Shiv Sena to organise a rally in Ayodhya for Ram Mandir
Shiv Sena to organise a rally in Ayodhya for Ram Mandir

आता पुन्हा एकदा राममंदिराचे राजकारण करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असून, 'चलो अयोध्या'चा नारा दिला आहे. शिवसेनेने हा मुद्दा हाती घेतला असला, तरी आगामी निवडणुकांत त्याचा उपयोग किती होईल हा महत्त्वाचा प्रश्‍न आहेच. 

शिवसेनेसारखे पक्ष कार्यक्रमांवर चालतात. बाळासाहेबांनी हात उंचावला, काम सांगितले की चतुरंगसेनेने तसेच वागणे ही शिवसेनेची शिस्त आहे. शिवसेनाप्रमुखांच्या निधनाला काही वर्षे झाली, तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संघटनेत ती शिस्त कायम ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. कार्यक्रमांवर पोसल्या जाणाऱ्या अशा संघटनेच्या कार्यपत्रिकेवर सतत कोणता तरी कार्यक्रम आवश्‍यक असतो. कार्यक्रम तयार असला की मग सैन्य हलते. सरकारमध्ये सहभागी असलेल्या 'शिवसैन्या'वर सध्या मर्यादा आहेत. ठिकठिकाणच्या मेळाव्यांत आक्रमक भाषणे होत असली, तरी आपण सरकारचा भाग आहोत याचे स्मरण काही बोलघेवडे वगळले, तरी सर्वांना आहे. सरकारमध्ये सहभागी झालेली शिवसेना तेथे का आहे याचे उत्तर कुणालाही देता येत नसल्याने आता त्यांना स्वत:चा वेगळा कार्यक्रम असणे गरजेचे झाले होते. अयोध्येतील राममंदिराच्या निमित्ताने शिवसेनेने हा कार्यक्रम शोधून काढला आहे. 

शिवसेना हा एकेकाळचा मराठी माणसाच्या हिताच्या नावे राजकारण करणारा प्रादेशिक पक्ष देशातील वारे लक्षात घेत हिंदुत्ववादी झाला. बाळासाहेबांच्या प्रतिमेमुळे, त्यांचे सगळेच आक्रमक असल्याने हिंदुत्वालाही आक्रमकतेचे लेबल लागले. बाबरी मशीद पडल्यामुळे भारतीय जनमानस अस्वस्थ झाल्यावर क्षणाचीही उसंत न दवडता बाळासाहेबांनी 'माझ्या शिवसैनिकांनी ढाचा पाडला, मला त्यांचा अभिमान आहे,' असे विधान केले. त्यामुळे हिंदुत्वाला बळ मिळाले का माहीत नाही, पण शिवसेनेची आक्रमक प्रतिमा देशासमोर अधिकच उग्ररूपात पेश झाली. 

आता पुन्हा एकदा राममंदिराचे राजकारण करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. उद्धव ठाकरे कधीतरी उत्तम स्ट्रॅटेजी करतात. शिवशक्‍ती आणि भीमशक्‍ती हे बेरजेचे समीकरण आठवा. कालांतराने रामदास आठवले यांना खासदारकी न देता या समीकरणाला त्यांनीच दूर ठेवले. पण आता निवडणुकीच्या ऐन मोक्‍यावर शिवसेनेतील कुणीतरी अत्यंत हुशारीने अयोध्येचा मुद्दा शोधून काढला. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांनी काही महिन्यांपूर्वी 'चलो अयोध्या'चे फलक मोक्‍याच्या ठिकाणी लावले. हे अर्थातच उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसारच झाले असावे. संघटनेला कार्यक्रमाची प्रतीक्षा होतीच, मग 'चलो अयोध्या'चे नारे सुरू झाले. उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत 'मंदिर भव्य बनायेंगे, लेकिन तारीख नहीं बनायेंगे' अशी तक्रार केली होतीच. त्यामुळे आता भाजपपेक्षाही आम्ही मंदिराचे तारणहार आहोत हे दाखवत मंडळी कामाला लागली आहेत. गावोगावच्या शिवसेना शाखा 'मंदिर भव्य बनायेंगे'च्या घोषणा देऊ लागल्या आहेत. निवडणूक वर्षात शाखांना काम हवे असतेच. ते रामनामाच्या नावे मिळत असेल तर अर्थात हिंदुत्ववादी संघटनांची वाढ लवकर होते.

भारतीय जनता पक्षाशी युती करायची असेल तर त्यासाठी हाती असलेला मुद्दा राममंदिर असू शकतो. मंदिराच्या निर्माणासाठी आम्ही एकत्र आलो असे वातावरण निर्माण करता येऊ शकते. मंदिर वैचारिक भावंडांना एकत्र आणेल काय ते लवकरच कळेल. महत्त्वाचा मुद्दा आहे तो सरकारी मांडवाखाली गेलेली शिवसेना आणखी किती वाढू शकते हा. आजमितीला शिवसेना महाराष्ट्रातला क्रमांक दोनचा पक्ष आहे. भाजपच्या खालोखाल शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून आले आहेत. या लोकसभेत शिवसेनेचे सर्वाधिक 17 खासदार निवडून आले. मोदीमहिम्याचा तो परिपाक होता. येत्या निवडणुकांसाठी युती झाली नाही तर असे निकाल लागणार नाहीत. शिवसेनेलाही त्याची जाणीव असणार. त्यामुळेच गेल्या आठवड्यात मवाळपणाकडे झुकू लागलेली भाषा वाचली तरी रामनामाचा महिमा युती प्रत्यक्षात आणेल असे दिसते. रामनामामुळे जागा वाढतील काय हे सांगता येत नाही, पण एकत्र येण्याची परिस्थिती मात्र निर्माण होऊ शकते. मात्र शिवसेना तोच मुद्दा हातात घेऊन अधिक जागा वाढवून मागण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेने सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ठाणे जिल्हा वगळता प्रत्येक जिल्ह्यात जागा कमी झाल्या. ठाणे महापालिकेचा अपवाद सोडला तर शिवसेनेची सर्वत्र पडझड होते आहे. मोदींना अनुकूल वातावरण नसेल तर भाजपलाही फटका बसेल. पण शिवसेनेचे नुकसान मोठे असेल. 'मराठी बाणा', 'मुंबईतला मराठी माणूस' हे मुद्दे आता कालबाह्य झाले आहेत. शिवसेनेचे काही आमदार, नगरसेवक अत्यंत मजबूत संघटना बांधून आहेत. शिवसेना त्या त्या भागात नागरिकांच्या मनाचा ठाव घेऊ शकते, मात्र अशा भागांची संख्या क्षीण झाली आहे.

नोव्हेंबरअखेरीस अयोध्येस जाण्याचा मनसुबा सिद्धीस नेण्यासाठी अख्खी शिवसेना सक्रिय झाली आहे. शिवसेनेत नेता म्हणेल ते मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे आता 'चलो अयोध्या'चे अभियान सुरू झाले आहे. शरयू तीरावर शिवसैनिक किती मावणार याचीही कोष्टके आहेत. शिवाय शिवसेना मदतीसाठी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मदत घेत आहे. अयोध्येचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने सोडवावा असे सर्वमान्य मत आहे. कायदा हातात घेऊन मंदिर बांधावे असे मानणारा वर्ग किती आहे, नवमतदारांना राममंदिर हा निवडणूक जिंकवणारा मुद्दा वाटू शकेल काय, यावर पुढची गणिते अवलंबून आहेत. त्यामुळे 'चलो अयोध्या'चा नारा दिला गेला असला तरी प्रत्यक्षात त्याचा उपयोग किती होणार हा प्रश्‍न आहेच. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com