शिवसेना व आघाडीची सत्ता स्थापनेसाठी तयारी 

congress-ncp-shivsena
congress-ncp-shivsena

मुंबई - भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस अशी नवी आघाडी करून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करण्याचे स्पष्ट संकेत आज शिवसेना व कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या स्वतंत्र पत्रकार परिषदांतून मिळाले आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत सत्तेत जाण्याचे सूचक विधान करत काही मुद्‌द्‌यांवर अगोदर आघाडीच्या पक्षांत चर्चा होईल, त्यानंतर शिवसेनेसोबत समान किमान कार्यक्रम आखून सत्तेपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जाईल, असे कॉंग्रेसचे नेते अहमद पटेल व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले, तर आघाडीने शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याच्या निमंत्रणास सहमती दर्शविल्याचा दावा करत शिवसेना सत्ता स्थापन करणारच, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. 

कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज संयुक्‍त पत्रकार परिषद झाली. या वेळी आघाडीच्या वतीने संयुक्‍त पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. शिवसेनेने सोमवारी (ता.11) पहिल्यांदाच कॉंग्रेस व राष्ट्रवादीला संपर्क केल्याची माहिती अहमद पटेल व शरद पवार यांनी दिली. चोवीस तासांत अशाप्रकारे तातडीने सत्ता स्थापन करण्यापर्यंत पोचता येणार नसून, काही प्रमुख मुद्‌द्‌यांवर स्पष्टीकरण गरजेचे आहे. दोन्ही पक्षांची सहमती झाल्यानंतर पुढे जाता येईल, असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत बोलताना अहमद पटेल यांनी आगामी काळात शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास कॉंग्रेसची तयारी असल्याचे संकेत दिले. अद्याप शिवसेनेला अधिकृतपणे पाठिंबा दिलेला नसला तरी, त्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे नेते स्वतंत्रपणे काही मुद्द्यांवर चर्चा करून अंतिम निर्णय घेतील, असे अहमद पटेल यांनी स्पष्ट केले. 

सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीत शिवसेनेसोबत सत्तास्थापनेसाठी तयारी करण्यावर एकमत झाले. मात्र, त्यासाठी समान किमान कार्यक्रम आखून तो शिवसेनेसोबत एकत्र बसून अंतिम केला जाईल, असे आघाडीच्या नेत्यांनी सांगितले. 

दरम्यान, राज्यात अत्यंत तातडीने राष्ट्रपती राजवट लागू केल्याबद्दल अहमद पटेल यांनी टीका केली. भारतीय जनता पक्षाने या अगोदरदेखील अनेक राज्यांत अशाच प्रकारे सत्तेचा दुरुपयोग करून सत्ता स्थापन केल्याचे सांगत लोकशाहीचा गळा घोटण्याचे कृत्य भाजप सतत करत असल्याचे पटेल म्हणाले. 

भरपूर वेळ आहे, काळजी नको - पवार 
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केल्यामुळे राज्यपालांनी आता भरपूर वेळ दिला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची घाई नाही, असे सांगताना शरद पवार यांनी शिवसेनेसोबतच्या सत्ता स्थापनेची चर्चा सुरू झाल्याचे या वेळी मान्य केले. मात्र, प्रत्यक्षपणे सत्ता स्थापनेसाठी आवश्‍यक त्या बाबींवर शिवसेनेसोबत अद्याप चर्चा झालेली नाही. सोमवार (ता.11) ला दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी पहिल्यांदाच अधिकृत बैठक झाली असल्याने यापुढे आघाडी कोणत्या मुद्‌द्‌यांवर करायची, यावर एकमत झाल्यानंतर शिवसेनेसोबत अधिकृत चर्चा सुरू होईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com