
Shiv Sena Row : ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच आमचा पक्ष अन् हेच आमचे चिन्ह’
सोलापूर : आमची लढाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नसून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आहे. यामुळे ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच आमचा पक्ष आणि हेच आमचे चिन्ह’ आहे, असा ठराव करत घोषणाबाजीने सोलापूर शहर शिवसेनेचे कार्यालय दणाणून निघाले.या वेळी विरोधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला आव्हान देण्याचा एल्गार पुकारलण्यात आला.
जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहरप्रमुख विष्णू कारमपुरी, युवासेनचे राज्य विस्तारक शरद कोळी, अमर पाटील, प्रताप चव्हाण, निरंजन बोद्धुल यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे म्हणाले की, यापूर्वी काँग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी यांच्यावरही असा प्रसंग आला होता.
कन्याकुमारीपर्यंत सर्व राज्यात काँग्रेस विजयी झाली होती. याची पुनरावृत्ती शिवसेनच्याबाबतीत होणार आहे. यामुळे शिवसैनिकांनी खचून न जाता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे त्यांनी सांगितले. वाय. एस. रेड्डी व इंदिरा गांधी यांचा इतिहास लक्षात घेता, यापुढे महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा पक्ष ठरणार आहे.
आगामी काळ हा उद्धव ठाकरे यांचाच असेल कारण आज शिवसैनिकांपेक्षा सामान्य माणूस उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढे केलेले प्यादे आहे. आता आपली लढत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर नसून मोदी शहा यांच्याबरोबर असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी संतोष केंगनाळकर भीमाशंकर म्हेत्रे,संतोष पाटील, आनंद बुखानुरे, राजू बिराजदार, रेवन पुराणिक, अमित भोसले, दीपक गवळी, धनराज जानकर, संभाजी कोंडगे, सचिन गंदुरे, संदीप बेळमकर, संजय गवळी, रविकांत कांबळे, संगमेश्वर बिराजदार, सोमनाथ पात्रे, रोहित तडवळकर, विठ्ठल कुराडकर, राम चव्हाण यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवडणूक आयोगाने काल शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्याचे पडसाद सोलापूरी शिवसेनेत तीव्र उमटले.
गाढवांसाठी कारमपुरींचा शेवटपर्यंत अट्टहास
निवडणूक आयोगाचा निषेध व्यक्त करण्यासाठी ‘केंद्रीय निवडणूक आयोग’ असा फलक गाढवाच्या गळ्यात बांधण्यासाठी शहराध्यक्ष विष्णू कारमपुरी सुरवातीपासून आग्रही होते. बैठक सुरु असताना त्यांनी दोन वेळा बाहेर जाऊन गाढवांची व्यवस्था करण्यासाठी कार्यकर्ते कामाला लावले. हातात फलक घेऊन श्री. कारमपुरी बैठकीतून बाहेरदेखील आले.
दरम्यान दोन गाढवे आणण्यात आली. मात्र जमलेले पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी व पोलिसांना पाहून गाढवे बिथरली आणि उधळत गेली. ती परत आलीच नाहीत. कार्यालयाबाहेर पोलिस आहेत.
या भीतीने गाढवाच्या मालकानेही गाढवांना पुन्हा कायालर्यालकडे आणण्याला नकार दिला. तरीही श्री.कारमपुरी हे गाढवे आणली जातील यावर ठाम होते. प्रसार मध्यमांचे प्रतिनिधीही कॅमेरे सरसावून गाढवाची वाट पहात होते. गाढवे न आल्याने कारमुरींचा हेतू साध्य झाला नसावा. यावेळीची त्यांची अस्वस्थता लपून राहिली नाही.
इतिहासात नोंद होणार
शिवसेनेवर ओढवलेल्या या प्रसंगाची इतिहासात नोंद होणार आहे. कारण कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा असेल. मशाल चिन्हावरील पहिला आमदारही निवडून आला आहे. यामुळे भविष्यातील पुढील पिढी नक्की विचार करेल.
शिवसेनेच्या पडत्या काळात उद्धव ठाकरे यांच्याबरोबर कोण कोण होते? यामुळे आपला पक्ष, चिन्ह व भवितव्य फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत, असा ठराव या बैठकीत घेण्यात आला.