निर्णयाचे स्वागत, पण काळ्या पैशाचे काय- शिवसेना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

हा काळ्या पैशावरील ‘हल्ला’च असला तरी त्यामुळे भ्रष्टाचारी आणि काळा पैसेवाल्यांची वळवळ कायमची थांबते का, किती काळा पैसा बाहेर येतो या प्रश्‍नांची उत्तरेही भविष्यातच मिळू शकतील. शेवटी भ्रष्टाचार ही एक प्रवृत्ती आहे. ती जोपर्यंत मुळापासून नष्ट होत नाही तोपर्यंत काळ्या पैशाचा रोग पूर्णपणे बरा होणार नाही, अशी टिपण्णी सेनेने केली आहे. 

पंतप्रधान मोदी यांचा हा दुसरा ‘स्ट्राइक’ म्हणजे काळ्या पैशावरील ‘हल्ला’च असला तरी त्यामुळे भ्रष्टाचारी आणि काळा पैसेवाल्यांची वळवळ कायमची थांबते का, किती काळा पैसा बाहेर येतो या प्रश्‍नांची उत्तरेही भविष्यातच मिळू शकतील, असे म्हणत शिवसेनेने नोटा बंद करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले, मात्र काळ्या पैशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखात या निर्णयावर सेनेने भाष्य केले आहे. 
बनावट नोटांमुळे देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आली असे जर सरकारचे म्हणणे असेल तर मग या धोक्याचे मूळ आजपर्यंत उखडून का फेकले गेले नाही, असा प्रश्‍न शिवसेनेने उपस्थित केला आहे. 
पुढे म्हटले आहे की, धोक्यात आलेली अर्थव्यवस्था ठीक करणे हे सरकारचे कर्तव्य आहेच, पण या व्यवस्थेला पोखरणारी बनावट नोटांची वाळवी वेळीच नष्ट करणे हीदेखील सरकारचीच जबाबदारी ठरते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देशाबाहेर गेलेला काळा पैसा परत आणण्याचे आश्‍वासन मोदी यांनी दिले होते. एवढेच नव्हे तर हा पैसा भारतात आला तर प्रत्येक देशवासीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होऊ शकतात असेही ते म्हणाले होते. अशी आठवणही 'सामना'तून करून दिली आहे.

हा काळ्या पैशावरील ‘हल्ला’च असला तरी त्यामुळे भ्रष्टाचारी आणि काळा पैसेवाल्यांची वळवळ कायमची थांबते का, किती काळा पैसा बाहेर येतो या प्रश्‍नांची उत्तरेही भविष्यातच मिळू शकतील. शेवटी भ्रष्टाचार ही एक प्रवृत्ती आहे. ती जोपर्यंत मुळापासून नष्ट होत नाही तोपर्यंत काळ्या पैशाचा रोग पूर्णपणे बरा होणार नाही, अशी टिपण्णी सेनेने केली आहे. 
 
Web Title: shiv sena welcomes demonetization, but questions black money