शिवसेनेचा रिमोट मुख्यमंत्र्यांच्या हाती 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतरच नेत्यांचा शिवसेना प्रवेश 

मुंबई : सत्तेत राहून शिवसेना सरकारवर तिखट शब्दांत प्रहार करत असली तरी आघाडीतल्या नेत्यांच्या प्रवेशासंदर्भात शिवसेनेचा रिमोट मुख्यमंत्र्यांच्या हाती असल्याचे चित्र आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील ज्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्या सर्वांनी अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतल्याची माहिती आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती कायम राहणार असल्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे. त्यामुळे, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून पक्षांतर करणाऱ्या नेत्यांच्या बाबतीत मुख्यमंत्री मतदारसंघ पाहून निर्णय घेत असल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार पाडुरंग बरोरा, संदीप नाईक, सचिन अहिर, रश्‍मी बागल तर कॉंग्रेसमधून आमदार निर्मला गावित या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप सोपल हे गुरुवारी (ता.29) शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या सर्वच नेत्यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी फडणवीस यांच्याशी चर्चादेखील केली. मात्र, फडणवीस यांनी त्यांना शिवसेनेतच प्रवेश घेण्याचा सल्ला दिल्याचे सूत्रांनी सांगितले. यावरून शिवसेना-भाजप युती निश्‍चित होणार असल्याचे सूत्रांचे मत आहे. 

सध्या फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्यात युतीबाबत चर्चा सुरू असून जागावाटपाचे सूत्र लवकरच जाहीर होईल, असा दावा केला जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला युतीबाबत डिवचले असले तरी उद्धव ठाकरे यांनी त्यावर तिखट प्रतिक्रिया दिली नाही. मुख्यमंत्री व अमित शहा यांच्यासोबतच युतीच्या जागावाटपाचे सूत्र निश्‍चित होणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे, लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेसोबत युती करताना मुख्यमंत्र्यांनी विधानसभेसाठी युतीची बोलणी करत ठाकरे यांना विश्‍वास दिल्याचे सांगितले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Senas Remote are in Chief Ministers hand