चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा ‘इतिहास’ पुसण्याचा संतापजनक प्रकार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

निवडणुकीच्या रणधुमाळीत जनमनांतील अस्मिता तेवत ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा पदोपदी गजर होतो, मात्र महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहासच हद्दपार करण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.

मुंबई : ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाला केंद्रीय शिक्षण मंडळाकडून पुरेसे स्थान देण्यात येत नसल्याची टीका राज्यातून सातत्याने होत असताना राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने नेमका तोच कित्ता गिरवला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत जनमनांतील अस्मिता तेवत ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा पदोपदी गजर होतो, मात्र महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहासच हद्दपार करण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राची संस्कृती जपत आंतरराष्ट्रीय शिक्षण राज्यातील विद्यार्थ्यांना मिळावं या दृष्टीने महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची सुरुवात केली. या मंडळाने यंदा पहिली ते चौथीच्या पुस्तकाची छपाई केली आहे. त्यातून ही बाब समोर आली. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना शिवाजी महाराजांचा इतिहास कधीही न बदलण्याचा ठराव विधिमंडळात झाला होता.

त्यानंतर अनेक सरकार बदलली मात्र पुस्तकातील अभ्यासक्रमात छ. शिवाजी महाराजांचा इतिहास कायम ठेवण्यात आला होता. या प्रकारावर बोलण्यास आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. याबाबत बोलताना काँग्रेसचे माजी खासदार अशोक चव्हाण म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हद्दपार करणाऱ्या भाजपा-शिवसेनेचे सरकार हद्दपार करण्याची हीच ती वेळ आहे. त्यामुळे राज्यातील शिवप्रेमींनी आता घालवुया सरकार हे एकच उद्दिष्ट ठेऊन काम कराव असं आवाहन त्यांनी केलं आहे.

तसेच या प्रकारावर खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी संताप व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चौथीच्या पुस्तकातून पुसण्याचा घाट घातला गेला असेल तर हे खपवून घेतलं जाणार नाही. ज्यांनी कुणी ही आगळीक केली असेल, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, यांचं धाडसच कसं झालं? मी केंद्रीय शिक्षण मंडळाकडून शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जावा म्हणून प्रयत्न करतोय, अनेकदा केंद्रीय शालेय शिक्षण मंत्र्यांची या संदर्भात भेट घेतली आहे. देशभर महाराजांचं कर्तृत्व पोचावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रीयांची व सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असताना, महाराष्ट्रातच उलटी गंगा वाहावी? ही आगळीक अजिबात खपवून घेतली जाणार नाही अशा शब्दात छत्रपती संभाजी महाराजांनी इशारा दिला आहे.

याबाबत शिक्षण आयुक्त आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे प्रभारी संचालक विशाल सोळंकी आणि सचिव विकास गरड यांनी बोलण्यास नकार दिला. 
 

पुस्तकात काय?
आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या वेगळ्या पैलूंची ओळख तर सोडाच पण आतापर्यंत राज्यमंडळाच्या पुस्तकांत गोष्टीरुपात मांडण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पराक्रम, लढाया याचाही समावेश केलेला दिसत नाही. केवळ  भारतीय लोक या घटकांत शिवाजी महाराज, रामदास स्वामी, एकलव्य, लाल बहादूर शास्त्री आणि हनुमान यांची त्रोटक माहिती आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivaji maharaj history removed from 4th standard book