राज्यभरातील संग्रहालये घडवतात शिवकाळाचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

विविध शस्त्रे, हस्तमुद्रा, नाणी, राजमुद्रांसह चित्रमय संकल्पनेतून होतो इतिहास जिवंत

विविध शस्त्रे, हस्तमुद्रा, नाणी, राजमुद्रांसह चित्रमय संकल्पनेतून होतो इतिहास जिवंत

सातारा- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे अनेक गडकोट महाराष्ट्रभरात आहेत. या किल्ल्यांना भेटी देऊन शिवकालीन थरार अनुभविण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. अशा गड-किल्ल्यांप्रमाणेच शिवशाहीच्या पराक्रमाचा इतिहास असलेल्या शस्त्रास्त्रांना जवळून पाहण्याची संधी राज्यभरातील काही संग्रहालये देतात. विविध प्रकारच्या तलवारी, चिलखते, जिरेटोप, दांडपट्टे, भाले, सोळाव्या आणि सतराव्या शतकातील पूजापात्रे, घट, देवतांच्या मूर्ती, हस्तलिखिते, नाणी, राजमुद्रा अशा बाबी पाहताना नकळत शिवकाळाची अनुभूती घेता येते.

शिवाजी महाराजांची हस्तमुद्रा
सातारा ः छत्रपती शिवाजी महाराज यांची हस्तमुद्रा साताऱ्यात उपलब्ध आहे, ही माहिती फार थोड्या लोकांना आहे. गंध, केशर आणि चंदनात भिजविलेल्या उजव्या हाताचा हा ठसा एका कागदावर उमटविलेला आहे. त्याची मूळ प्रत साताऱ्यातील छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयात आहे. याशिवाय, औंधच्या वस्तुसंग्रहालयात शिवाजी महाराज यांचे मोडी लिपीतील पत्रही मिळते. शिवकालात इनामनामा तयार करताना त्या कागदपत्रावर हस्तमुद्रा उमटविण्याची पद्धत होती. असा एक इनामनामा म्हसवडच्या राजेमाने यांच्याकडे होता. त्यावर शिवाजी महाराज यांची हस्तमुद्रा उमटविलेली आहे. हा कागद राजेमाने कुटुंबीयांनी प्रयत्नपूर्वक जपला होता. त्याची देवघरात पूजा व्हायची. नंतर तो सरकारकडे आला. ही हस्तमुद्रा आजही साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयात पाहायला मिळतो. या कागदावर "श्री महादेव' असेही लिहिलेले आहे.

इतिहासतज्ज्ञ ग. ह. खरे यांनी या हस्तमुद्रेच्या कागदाचे वाचन करून त्याला मान्यता दिली. साताऱ्याच्या राजघराण्याकडे शिवरायांची भवानी तलवार आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी साताऱ्याच्या राजघराण्याकडे असलेली तलवार हीच खरी भवानी तलवार असल्याचा निर्वाळा दिला आहे. मूळ भवानी तलवार इंग्लंडला असल्याचे सांगणारा एक मतप्रवाह आहे.

वाघनखे, सांग, माडू, गुर्ज, विटा
औरंगाबाद ः येथील सुभेदारी विश्रामगृहाजवळ असलेले महापालिकेचे "श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय' म्हणजे शिवकालीन इतिहासाच्या सुवर्णवैभवाची गाथा सांगणारी वास्तू. सुमारे 1100 चौरस मीटर जागेवर 1999 मध्ये हे संग्रहालय उभारले गेले. पुराणवस्तू संग्राहक डॉ. शांतीलाल पुरवार यांनी आपल्या संग्रहातील तीन हजार शिवकालीन वस्तू येथे दिल्या. वाघनखे, सांग, माडू, गुर्ज, विटा, त्रिक, विविध प्रकारच्या तलवारी, चिलखत, जिरेटोप, दांडपट्टा, विविध प्रकारचे भाले अशा अतिशय मौल्यवान वस्तू "शिवरायांची युद्धनीती' या दालनात मांडलेल्या आहेत. शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या किल्ल्यांची छायाचित्रे, आरमाराचे नकाशे, पूजापात्रे, घट, देवतांच्या मूर्ती, हस्तलिखिते येथे दिसतात. शिवाय बहामनी, निजामशाही, आदिलशाही, बरीदशाही, कुतुबशाही नाणी आणि शिवाजी महाराज यांच्या काळातील नाणी, राजमुद्राही येथे आहेत. या संग्रहालयातील वस्तूंमधून शिवकालीन तंत्रज्ञान, युद्धनीती, सामाजिक, राजकीय आणि धार्मिक जीवनाची माहिती मिळते.

चित्रकृतींतून पाहा शिवशाही
नाशिक ः शिवकालीन शस्त्रास्त्रांना जवळून पाहण्याची आणखी एक संधी नाशिकमधील (कै.) बाळासाहेब ठाकरे स्मारक संग्रहालयाच्या माध्यमातून उपलब्ध आहे. गंगापूर रोडवर जीव्हीके कंपनीतर्फे साकारलेल्या या स्मारकात शिवशाहीर पुरंदरे यांनी संकलित केलेली शिवकालीन शस्त्रे शिवाजी महाराज यांच्या शौर्याची साक्ष देतात.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून हे संग्रहालय साकारले आहे. शिवशाहीर पुरंदरे यांनी संकलित केलेली शिवकालीन शस्त्रे संग्रहालयात आहेत. तलवारी, ढाल, भाले आणि अन्य शस्त्रे जवळून अनुभवता येतात. संग्रहालय परिसरात छत्रपती शिवरायांच्या इतिहासाशी निगडित महत्त्वपूर्ण घटना चित्ररूपात मांडल्या आहेत. मुंबई, नाशिकमधील चित्रकारांनी या चित्रकृती साकारल्या आहेत.

Web Title: shivarji maharaj and fort in maharashtra