Shiv Jayanti :  आपलं नशीब थोर म्हणून शिवरायांचा पाय अनावधानाने चुन्याच्या लादीवर पडला अन्...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Jayanti

Shiv Jayanti :  आपलं नशीब थोर म्हणून शिवरायांचा पाय अनावधानाने चुन्याच्या लादीवर पडला अन्...!

राजे म्हणजे निश्चयाचा महामेरु, जे-जे म्हणून ठरवलं ते-ते करून दाखवलं. मग ती स्वराज्य निर्मिती असो वा भर समुद्रात बांधलेला सिंधुदुर्ग असो, दोन्ही गोष्टी या एकमेवाद्वितीयच! महाराजांच्या याच किल्ल्यावर एक महाराजांच्या बाबतीत एक योगायोग घडला होता. आपल्या पिढीचे नशीब थोर म्हणूनच तो योगायोग घडला आणि आपल्याला एक खास गोष्ट मिळाली. काय आहे हा नक्की प्रकार पाहुयात.

मालवण, तारकर्लीला गेलेला प्रत्येक व्यक्ती निळाशार समुद्रातील भक्कम सिंधुदुर्ग पाहण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही. सिंधुदुर्ग हा जलदुर्गांमधील सर्वात मोठा आणि आकर्षक किल्ला आहे. या किल्ल्यावरूनच या जिल्ह्याला सिंधुदुर्ग असे नाव पडले आहे. समुद्रकिनाऱ्यापासून साधारणता तीन किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांना जंजिरा किल्ला जिंकता आला नाही. त्यामुळेच मालवणमध्ये तसाच किल्ला उभारायचं स्वप्न महाराजांनी पाहिलं. ते स्वप्न त्यांनी सत्यातही उतरवलं. महाराजांचे तेच स्वप्न म्हणजे हा सिंधुदुर्ग.

सिंधुदुर्ग किल्ला

सिंधुदुर्ग किल्ला

10 नोव्हेंबर 1664 ला मालवणमधील कुरटे नावाच्या बेटावर 44 एकर क्षेत्रावर सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी करण्यात आली. या किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराज यांनी 1689 ते 1700 दरम्यान बांधलेले देशातील एकमेव असे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. या मंदिरात शिवबांची सुंदर मूर्ती वीरासनात बसलेली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची मुहूर्तमेढ या किल्ल्याच्या बांधणीने रोवली. हा किल्ला बांधण्यासाठी 500 पाथरवट, 200 लोहार, तीन हजार मजूर आणि शेकडो कुशल कारागीर होते, असा उल्लेख या गडावरील शिलालेखावर आढळतो.

याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे आपल्याला पहायला मिळतात. नगारखाना पाहून बुरजाजवळ आलो की ते एका कोनाड्यात सुरक्षीत असलेले दिसतात. पुरातत्व विभागाने त्या कानोडींना काचेचे आवरण घालून अधिक सुरक्षित केले आहेत.

किल्ल्याचे विहंगम दृश्य

किल्ल्याचे विहंगम दृश्य

या ठशांबद्दल असे सांगितले जाते की, कारागिरांनी मागणी केली म्हणून ते ठसे महाराजांनी दिले. पण, तसे नाही. किल्ल्याच्या बांधकामाची पाहणी करताना बांधकामावेळी एक खास प्रसंग घडला. त्या काळात बांधकामासाठी चूना वापरला जायचा त्यामूळे तिथे असलेल्या ओल्या लादीवर महाराजांचा डाव् पाय पडला. त्याचा छाप तसाच त्या दगडावर उटला. तर, पुढे किल्ल्याची पाहणी करताना मुंढारीचा आधार घेत महाराज बुरूजावर चढले तर त्यांच्या हाताचा ठसा चुन्याच्या लादीवर पडला. काहीतरी शुभ संकेत मानून कारागिरांनी ते चिन्हे तशीच ठेऊन इतर काम पूर्ण केले.

महाराजांच्या ठशांसाठी बनवलेला कानोडा

महाराजांच्या ठशांसाठी बनवलेला कानोडा

काळाच्या ओघात महाराजांचा हा अमुल्य ठेवा गायब होऊ नये म्हणून पुढे छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांच्या पत्नी महाराणी जिजाबाई यांनी ते ठसे सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले. महाराणी जिजाबाई यांचे यासंदर्भातील एक पत्र प्रसिद्ध आहे.

त्या पत्रात महाराणी जिजाबाई यांनी महाराजांच्या हाताचे आणि पायाच्या ठशांवर कानोडा बांधून त्याची नित्य पूजा करावी असा आदेश सुभेदार येसाजी शिंदे यांना दिला आहे. त्या आदेशानुसारच या महाराजांचे ठसे सुरक्षित करण्यासाठी त्यावर कानोडा बांधण्यात आला आहे. 

या पत्राचा संदर्भ जिजाबाई कालिन कागदपत्रे या पुस्तकात मिळतो. त्यातील पान क्रमांक १५७ आणि १५८ वर हे पत्र आहे. त्या पत्रात त्यांनी पोर्तूगिजांनी केलेला हल्ला मावळ्यांनी परतवून लावला याबाबतही चौकशी केलेली आहे.