रायगडावर उद्या शिवराज्यभिषेकदिन सोहळा, स्वच्छता मोहीमेने सुरवात 

सुनील पाटकर
मंगळवार, 5 जून 2018

हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडावर 6 जूनला अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे शिवराज्यभिषेकदिन सोहळा भव्य स्वरुपांमध्ये साजरा करण्यात येणार आहे. आजपासूनच गडावर शिवप्रेमींची गर्दी सुरु झाली आहे. 

महाड : हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडावर 6 जूनला अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे शिवराज्यभिषेकदिन सोहळा भव्य स्वरुपांमध्ये साजरा करण्यात येणार आहे. आजपासूनच गडावर शिवप्रेमींची गर्दी सुरु झाली आहे. 

या सोहळ्याला कोल्हापूरचे छत्रपीत संभाजीराजे, शहाजीराजे राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर उपस्थित राहणार आहेत. पर्यटक आणि शिवप्रेमी यांच्यात स्वच्छ व प्लास्टिक मुक्त रायगडची भावना रुजविण्यासाठी सकाळी रायगड विकास प्रधिकरणा कडून रायगड स्वच्छता मोहिम पार पडली. पाचाड येथून या स्वच्छता मोहीमेला सुरवात करण्यात आली. छत्रपती संभाजीराजे आणि युवराज शहाजीराजे हे या मोहिमेत सहभागी झाले होते. पाऊलवाट, रोपवे, सर्व बुरुज. महादरवाजा, चित्तदरवाजा आणि तटबंदीवरील प्लास्टीक कचरा या वेळी गोळा करण्यात आला. विविध संघटना आणि हजारो शिवप्रेमी या मोहिमेत सहभागी झाले होते.

विविध कार्यक्रम
6 जूनला सकाळी सात वाजता शाहिरी कार्यक्रमाला सुरवात करण्यात येईल. पारंपारीक वाद्याच्या गजरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीचे राजसरदरेवर आगमन होईल. खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे स्वागत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सव मुर्तीवर छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते विधीवत पूजन अभिषेक, त्यानंतर मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीवर सुवर्णाभिषेक, संभाजीराजे यांचे मार्गदर्शन, शिवरायांच्या प्रतिमेची पालखी जगदीश्वर मंदिराकडे वाजतगाजत जाईल व सोहळ्याची सांगता करण्यांत येईल.

चोख बंदोबस्त
शिवराज्याभिषेक सोहळ्या साठी रायगड पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली 3 पोलीस उपविभागीय अधिकारी, 9 पोलीस निरीक्षक, 20 सहाय्यक पो.नि. आणि पो.उपनिरीक्षक, 170 पोलीस शिपाई, 27 महिला पोलीस, 65 वाहतुक पोलीस, 2 आर सी पी प्लाटुन, एक एस आर पी कंपनी, बॅाम्ब शोधक पथक आणि विनाशक वाहन असा चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवप्रेमींसाठी अन्नछत्र, मंडप, पिण्याच्या पाण्याची सोय, वाहतूक व्यवस्था अशा सोयी करण्यात आल्या आहेत. सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवप्रेमींनी कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक गडावर आणू नये, गडावर येताना स्वत:चे ताट वाटी आणल्यास गडावर पत्रावळीचा वापर होणार नाही. येताना पिण्याच्या पाण्यासाठी धातूच्या बाटलीचा वापर करावा तसेच गड उतरताना प्रत्येकाने प्लास्टिक तसेच अन्य कचरा साफ करत यावे असे आवाहन समितीने केले आहे.
 

Web Title: Shivrajyabhishek day celebrations on Raigad, cleanliness campaign begins